उत्तर अमेरिकेतील सर्वात जुन्या मानव वसाहतीचा शोध | पुढारी

उत्तर अमेरिकेतील सर्वात जुन्या मानव वसाहतीचा शोध

वॉशिंग्टन ः न्यू मेक्सिकोमध्ये संशोधकांनी प्राचीन काळातील केसाळ हत्तींच्या म्हणजेच मॅमथच्या शिकारीचे ठिकाण शोधून काढले आहे. हे कदाचित उत्तर अमेरिकेतील मानवांचे सर्वात सुरुवातीच्या काळातील उदाहरण असावे असे संशोधकांना वाटते. त्याठिकाणी मॅमथची जी हाडे व अवशेष सापडले आहेत त्यावरून असे दिसते की मानवांनी मॅमथची शिकार करून त्याचे मांस काढले आहे. त्यासाठी काही अवजारांचाही वापर करण्यात आल्याचे पुरावे दिसले आहेत.

जर संशोधकांच्या या टीमने तेथील मानवी हालचालींबाबत केलेल्या संशोधनाची पुष्टी झाली तर उत्तर अमेरिकेतील मानवी वसाहतींच्या काळ दुप्पटीने अधिक मागे जाऊ शकतो. मात्र, उत्तर अमेरिकेत मानव सुरुवातीला कधीपासून अस्तित्वात आले त्याचा नेमका काळ ठरवणे हे गेल्या काही दशकांपासून अतिशय वादग्रस्त बनलेले आहे. सध्याही मॅमथच्या ‘कत्तलखान्या’च्या ठिकाणाबाबत जे नवे संशोधन झाले आहे त्याबाबतही अनेक संशोधकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. हे नवे पुरातत्त्वीय स्थळ उत्तर न्यू मेक्सिकोच्या कोलोरॅडो पठारावर आढळून आले आहे. गॅरी हार्टले नावाच्या एका हायकरला याठिकाणी काही मोठे हस्तीदंत सापडले होते. त्यानंतर या स्थानाकडे संशोधकांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे या ठिकाणाला ‘हार्टले मॅमथ लोकॅलिटी’ या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी दोन मॅमथचे अवशेष सापडले आहेत. त्यांची शिकार करून मानवाने त्यांचे मांस खाण्यासाठी घेतले होते असे तेथील संशोधनावरून दिसून आले आहे. हे अवशेष 36,250 ते 38,900 वर्षांपूर्वीच्या काळातील असावेत असेही आढळले आहे.

Back to top button