ज्वालामुखीतून आले होते मंगळावरील रहस्यमय खनिज | पुढारी

ज्वालामुखीतून आले होते मंगळावरील रहस्यमय खनिज

वॉशिंग्टन ः सात वर्षांपूर्वी मंगळभूमीवरील एका रहस्यमय खनिजाचा शोध लागला होता. त्यावेळेपासून हे खनिज संशोधकांच्या कुतुहलाचा विषय बनले होते व त्याबाबत सातत्याने संशोधन सुरू होते. आता असे दिसून आले आहे की हे खनिज मंगळावरील 3 अब्ज वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आले होते. हे खनिज सहसा पृथ्वीवरच पाहायला मिळते.

‘नासा’च्या ‘क्युरिऑसिटी’ या रोव्हरने मंगळावरील 154 किलोमीटरचा विस्तार असलेल्या ‘गेल क्रेटर’ या विशाल विवरातील एका दगडामध्ये 30 जुलै 2015 या दिवशी ड्रील करून हे खनिज शोधले होते. ड्रील केल्यावर या दगडामधून रूपेरी रंगाची धूळ बाहेर आली होती व तिचे नमुने संशोधनासाठी गोळा करण्यात आले होते. ‘क्युरिऑसिटी’वरील एक्स-रे डिफ्रॅक्शन लॅबोरेटरीने या धुळीचे विश्लेषण केल्यावर हे ‘ट्रायडीमाईट’ नावाचे खनिज असल्याचे निष्पन्न झाले. हे अतिशय दुर्मीळ प्रकारचे क्वॉर्ट्झ असून ते पूर्णपणे सिलिकॉन डायऑक्साईड किंवा सिलिकापासून बनलेले असते. विशिष्ट प्रकारच्या ज्वालामुखीच्या हालचालींमधून हे खनिज निर्माण झाले होते. हौस्टनमधील राईस युनिव्हर्सिटीमधील संशोधक व ‘नासा’च्या क्युरिऑसिटी टीममधील सदस्य किर्स्टेन सिबाच यांनी सांगितले की मंगळावर ट्रायडीमाईट सापडणे हे अत्यंत आश्चर्याचेच होते. क्युरिऑसिटी रोव्हरकडून मंगळभूमीवर दहा वर्षे केलेल्या संशोधधनातील हे सर्वाधिक आश्चर्याचे संशोधन होते. पूर्वी असे मानले जात असे की मंगळावरील ज्वालामुखींमुळे सिलिका असलेली खनिजे बनली जाऊ शकणार नाहीत. तसेच गेल क्रेटर हे एकेकाळी सरोवराचे ठिकाण होते व तिथे जवळपास ज्वालामुखी आढळत नसल्याने तिथे असे खनिज सापडण्याची शक्यताही नव्हती. मात्र, अशा ठिकाणी सिलिकायुक्त ट्रायडीमाईट सापडल्याने संशोधकांना आश्चर्य वाटणे साहजिकच होते. आता संशोधकांनी असे अनुमान काढले आहे की प्राचीन काळी मंगळावरील एखाद्या अज्ञात ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे खनिज असलेले दगड-माती आकाशात उडाले असतील व ते या सरोवरात पडले असतील.

Back to top button