रॉकेटच्या तुकड्याने दुखापतीचा 10 टक्के धोका | पुढारी

रॉकेटच्या तुकड्याने दुखापतीचा 10 टक्के धोका

टोरांटो :  अंतराळातील कचरा भविष्यात माणसाला बराच त्रासदायक ठरू शकतो. अंतराळात अनेक रॉकेट सोडले जातात. त्यांचाही कचरा पृथ्वीभोवती फिरत असतो. हे तुकडे कधी कधी पृथ्वीवरही कोसळत असतात. अशा एखाद्या रॉकेटच्या तुकड्याने माणूस गंभीर जखमी होण्याचा किंवा त्याचा मृत्यू होण्याचा सहा ते दहा टक्के धोका संभवतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

कॅनडातील बि—टिश कोलंबिया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी म्हटले आहे की, भविष्यातील धोका ओळखून आताच विविध देशांच्या सरकारांनी सामूहिक उपाययोजना केली पाहिजे. रॉकेटचा वापर केल्यानंतर त्यांचे तुकडे सुरक्षितपणे पृथ्वीवर येतील, हे पाहिले पाहिजे. त्यामुळे प्रक्षेपणाचा खर्च वाढू शकेल; पण एखाद्याचा मृत्यू होण्याचा धोका कमी होईल. संशोधक मायकल बायर्स यांनी सांगितले की, व्यवसाय किंवा अन्य गोष्टींसाठी मानवी जीवन धोक्यात टाकणे हे स्वीकार्ह आहे का? आपल्याला सुरक्षेचीच काळजी करावी लागेल.

ज्यावेळी सॅटेलाईटस्ना अंतराळात रॉकेटच्या सहाय्याने पाठवले जाते, त्यावेळी रॉकेटचे अनेक भाग कक्षेत सुटून जात असतात. हे भाग अपेक्षेपेक्षाही खालील कक्षेत राहिले, तर ते अनियंत्रित पद्धतीने पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊ शकतात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर अशा अनेक वस्तू जळून नष्ट होत असतात; पण काही मोठे व घातक तुकडे जमिनीवर आदळूही शकतात. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी एका सार्वजनिक उपग्रह तालिकेच्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळातील आकडेवारीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे व पुढील दहा वर्षांमध्ये मानवासमोर निर्माण होणार्‍या धोक्यांचे आकलन करण्यात आले.

Back to top button