आता पावसाचे पाणीही राहिले नाही शुद्ध!

आता पावसाचे पाणीही राहिले नाही शुद्ध!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : एके काळी पावसाच्या पाण्याला 'डिस्टिल्ड वॉटर'सारखे शुद्ध पाणी मानले जात होते; मात्र पृथ्वीवर सातत्याने वाढतचा चाललेल्या प्रदूषणामुळे आता हे आभाळातून येणारे पाणीही शुद्ध राहिलेले नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना पावसाच्या पाण्यातही 'पीएफएएस' नावाचे विषारी रासायनिक घटक आढळले आहेत. त्यामुळे कुणी पावसाचे आहे म्हणून शुद्ध पाणी समजून ते पिण्याचे धाडस करू नये.

'पीएफएएस'ला 'फॉरेव्हर केमिकल्स'च्या नावाने ओळखले जाते. जणू काही हे कायमस्वरूपी टिकणारेच रसायन आहे. याचे कारण म्हणजे त्याचे विघटन अतिशय धिम्या गतीने होत असते. सुरुवातीला हे रसायन पॅकेजिंग, शाम्पू किंवा मेकअप साहित्यामध्ये आढळले होते; मात्र आता ते पाणी आणि हवेसह आपल्या संपूर्ण वातावरणात आढळून येत आहे. स्टॉकहोम युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि याबाबतच्या संशोधनाचे मुख्य लेखक इयान कजिन्स यांनी सांगितले की, आमच्या संशोधनानुसार पृथ्वीवरील कोणतेही ठिकाण आता असे राहिलेले नाही जिथे पावसाचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित असेल. अगदी अंटार्क्टिका किंवा तिबेटच्या पठारावरही हीच स्थिती असल्याचे 2010 नंतरच्या पाहणीतून दिसून आले आहे.

पावसाचे पाणी आता पिण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या स्तराखाली गेले आहे. ही गाईडलाईन अमेरिकन पर्यावरण संरक्षण एजन्सी जारी करीत असते. अंटार्क्टिका आणि तिबेटमध्येही अमेरिकन पेयजल निर्देशांच्या तुलनेत पीएफएएस केमिकल्सचा स्तर चौदा पटीने अधिक असल्याचे दिसून आले. या रसायनामुळे प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होणे, मुलांच्या विकासात विलंब, लठ्ठपणा तसेच प्रोस्टेट, किडनी व टेस्टिकुलरसारखे काही प्रकारचे कर्करोग होण्याचाही धोका असतो. हे रसायन आता पृथ्वीच्या वातावरणात इतके फैलावलेले आहे की ते कधीच संपुष्टात येणार नाही, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news