
मेलबोर्न : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या डालगेटी येथे अवकाशातून तीन तुकडे पडल्याचे निष्पन्न झाले आहे. हे तुकडे प्रचंड वेगाने येऊन जमिनीत घुसले. यातील एक तुकडा त्रिकोणी असून तो 10 फूट इतका लांब आहे. ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने केलेल्या दाव्यानुसार हे तुकडे अॅलन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीच्या एखाद्या रॉकेट अथवा अवकाश यानाचे असू शकतात.
या तुकड्यांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच प्रचंड घर्षण झाल्याने या तुकड्यावर जळाल्याची चिन्हेही दिसत आहेत. माईक माइनर्स या शेतकर्याला 25 जुलै 2022 हे तुकडे दिसून आले. त्यानंतर त्याने खगोलशास्त्रज्ञ बॅड टकर यांना याबाबची माहिती दिली. टकर यांच्या मते, हे तुकडे स्पेसएक्सच्या ड्रॅगन एअरक्राफ्टचे तुकडे असू शकतात. हे तुकडे म्हणजे 2020 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या क्रू-1 मिशनचा बचावलेला भाग असू शकतात. अंतराळातून पृथ्वीवर कोसळलेल्या तुकड्यांवर सिरियल नंबरही लिहिले आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या सिव्हिल एविएशनच्या अधिकार्यांनी या अवकाशीय कचर्याबाबत अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ला माहिती दिली आहे. हे तुकडे शेतात कोसळले म्हणून बरे झाले. मात्र, ते जर घरावर कोसळले असते, तर मोठी हानीही होऊ शकली असती, असे तेथील माईक व जॉक वॉलेस यांनी सांगितले. आता हे तुकडे नासा अथवा स्पेसएक्स घेऊन जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.