कोपेनहेगन जगातील सर्वात सुरक्षित शहर | पुढारी

कोपेनहेगन जगातील सर्वात सुरक्षित शहर

लंडन ः डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. गेल्यावर्षी अव्वल स्थानावर असलेले जपानचे टोकियो तसेच सिंगापूर आणि ओसाका यांना मागे टाकून कोपेनहेगनने आता यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसर्‍या स्थानावर कॅनडाचे टोरांटो आणि तिसर्‍या स्थानावर सिंगापूर आहे.

‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स यूनिट’ (ईआययू) ने ‘सेफ सिटीज इंडेक्स-2021’ नावाची ही यादी तयार केली असून त्यामध्ये सर्वात सुरक्षित अशा साठ शहरांची सूची आहे. अव्वल 50 शहरांच्या यादीत दिल्‍ली 48 व्या तर मुंबई 50 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी दिल्‍लीचा 52 वा तर मुंबईचा 45 वा क्रमांक होता. ही यादी तयार करण्यासाठी जगभरातील शहरांची व्यापक पाहणी करण्यात आली होती.

‘ईआययू’ने शहरांची निवड करण्यासाठी 76 मापदंड ठेवले होते. त्यामधून शहराच्या सुरक्षेचे चित्र स्पष्ट होऊ शकते. या मापदंड किंवा निकषांमध्ये आरोग्य, डिजिटल, पायाभूत सुविधा, व्यक्‍तिगत आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा अंतर्भाव आहे. या मापदंडांनुसार सर्व शहरांना शंभरपैकी गुण देण्यात आले व त्यानुसार ही यादी तयार करण्यात आली. कोपेनहेगन, टोरांटो, सिंगापूर, सिडनी, टोकियो, अ‍ॅम्स्टरडॅम, वेलिंग्टन, हाँगकाँग, मेलबोर्न आणि स्टॉकहोम हे ‘टॉप टेन’ मध्ये आहेत.

Back to top button