तब्बल ६.४ हजार कोटी रुपयांचे पेंटिंग ! | पुढारी

तब्बल ६.४ हजार कोटी रुपयांचे पेंटिंग !

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव संग्रहालयात लिओनार्डो दा विंची या महान चित्रकाराने बनवलेले ‘मोनालिसा’हे पेंटिंग आहे. कलेच्या द‍ृष्टीने हे पेंटिंग किती मोलाचे आहे हे तर दुनिया जाणते. त्याशिवाय या पेंटिंगमधील अनेक गूढ गोष्टींची उकल करण्यासाठीही लोक प्रयत्नशील असल्यानेही हे चित्र चर्चेत असते. या अमूल्य कलाकृतीची किंमतच ठरवायची असेल तर सध्या ‘मोनालिसा’ पेंटिंगचे मूल्य सुमारे 867 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 6.4 हजार कोटी रुपये इतके आहे!

यूरोपमधील नवजागृतीच्या काळातील इटलीमधील एक हरहुन्‍नरी कलाकार म्हणजे लिओनार्डो दा विंची. त्याच्या अनेक प्रसिद्ध चित्रांपैकी सर्वात लोकप्रिय आणि ‘जगातील सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेले चित्र’ अशी ओळख असणारे पेंटिंग म्हणजे ‘मोनालिसा’. ही खरीच स्त्री होती की कल्पनेतीलच आहे याबाबतही मतभेद आहेत. काही लोकांच्या मते, ही स्त्री लिओनार्डोच्या एका श्रीमंत व्यापारी मित्राची पत्नी लिसा घेरार्डिनी ही होती. लिओनार्डोने सन 1503 मध्ये हे पेंटिंग बनवण्यास सुरुवात केली.

सन 1517 पर्यंत या पेंटिंगचे काम सुरूच होते. असे म्हटले जाते की मोनालिसाचे ओठ बनवण्यासाठी त्याला सर्वाधिक अडचणी येत होत्या. तिचे ओठ मनासारखे बनवण्यासाठीच त्याला सुमारे बारा वर्षे लागली! आता याच ओठातून व्यक्‍त होणारे तिचे मंद हास्य जगभरातील मोठ्या रहस्यांमधील एक रहस्य बनून राहिलेले आहे. दीर्घकाळापासून अनेक तज्ज्ञ या हास्याचा अभ्यास करून त्याविषयीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आले आहेत. तिचे हे हास्य चित्राला वेगवेगळ्या अँगलमधून पाहिले की वेगवेगळे भासते. एका कोणातून पाहिल्यावर ती मोकळे, स्पष्ट हास्य करीत असताना दिसते तर एका अँगलमधून पाहिल्यावर तिचे हे हास्य फिके दिसते. या हास्याबाबत अनेकांनी आजपर्यंत अनेक भन्‍नाट दावेही केलेले आहेत.

काही वर्षांपूर्वी एका डॉक्टरने म्हटले होते की मोनालिसाचे वरचे दोन दात तुटलेले आहेत. त्यामुळे तिचा वरचा ओठ काहीसा आतील बाजूस दबलेला आहे! सन 2000 मध्ये हार्वर्डमधील एका न्यूरोसायंटिस्टने सांगितले की मोनालिसाचे हास्य कुठूनही पाहिले तरी सारखेच असते, ते बदलत नाही. आपली मानसिकता कशी आहे यावर हे हास्य कसे दिसते ते अवलंबून आहे. जर तुम्ही खूश असाल तर मोनालिसाही प्रसन्‍न हास्य करीत असताना दिसते आणि तुम्ही खिन्‍न असाल तर तिचे हास्यही तसेच फिके दिसते!

Back to top button