लाल ग्रह बनत आहे निळा? | पुढारी

लाल ग्रह बनत आहे निळा?

वॉशिंग्टन : मंगळाच्या स्वरूपाचे वर्णन करीत असताना त्याला नेहमीच ‘लाल ग्रह’ असे म्हटले जाते. मात्र, मंगळभूमीचे एक नवे छायाचित्र पाहता हा ग्रह आता निळा बनत आहे की काय अशी शंका यावी! ‘नासा’च्या ‘मार्स रिकनायसन्स ऑर्बिटर’ने हे छायाचित्र टिपले आहे. त्यामध्ये मंगळभूमीवर ‘निळसर’ छटा असलेला भाग दिसून येतो. या छायाचित्रातून मंगळाच्या भूतकाळातील हवामानाचा पॅटर्न जाणून घेण्यास मदत मिळेल असे संशोधकांनी म्हटले आहे. या छायाचित्रातील गुपित संशोधकांनी नंतर उघड केले.

हे छायाचित्र मंगळाच्या भूमध्य रेखेच्या उत्तरेकडील गँबो क्रेटरच्या आतील भागाचे आहे. छायाचित्रात दिसणारा हा निळा रंग नकली असून तो इमेज प्रोसेसिंगच्या माध्यमातून बनवलेला आहे. मंगळाचा असली रंग लालच आहे! या छोट्याशा छायाचित्रात बरेच मोठे क्षेत्र दिसून येते. एका पिक्सेलमध्येच सुमारे 25 सेंटीमीटरचे क्षेत्र आहे.

या छायाचित्रात गॅम्बो क्रेटरच्या केंद्राजवळ हवेशी संबंधित विविधता दर्शवण्यात आली आहे. मोठ्या टेकड्या घुमावदारही दिसून येत आहेत. त्यांच्यावरही अनेक शिखरे दिसून येतात. याठिकाणी मातीच्या टेकड्या कशा स्वरूपाच्या आहेत हे लवकर कळावे यासाठी छायाचित्रात अशा विविध रंगांचा वापर करण्यात येतो.

Back to top button