केवळ ओल्या झाल्यावर दिसणार्‍या प्राचीन पाऊलखुणा! | पुढारी

केवळ ओल्या झाल्यावर दिसणार्‍या प्राचीन पाऊलखुणा!

न्यूयॉर्क : उटाहच्या वाळवंटातील मिठाच्या मैदानात प्राचीन काळातील शिकारी लोकांच्या पावलाचे ठसे आहेत. मात्र, हे ठसे पावसामुळे ओले झाल्यावर आणि त्यांच्यामध्ये आर्द्रता भरल्यावरच दिसून येतात. सूर्यप्रकाशात कोरडे पडल्यानंतर हे ठसे पुन्हा एकदा दिसेनासे होतात. त्यांच्या याच वैशिष्ट्यांमुळे त्यांना ‘घोस्ट फुटप्रिंटस्’ म्हणजेच ‘भुताच्या पायाचे ठसे’ असे म्हटले जाते. तब्बल दहा हजार वर्षांपूर्वीच्या लोकांच्या पाऊलखुणा याठिकाणी आहेत.

जुलै महिन्यात संशोधकांना या ठशांचा अपघातानेच शोध लागला. उटाहच्या ग्रेट सॉल्ट लेक डेझर्टच्या हिल एअर फोर्स बेसवरील एका जवळच्याच पुरातत्त्वीय स्थळाकडे जात असताना त्यांना या पाऊलखुणा आढळल्या.

सुरुवातीला त्यांना बोटांवर मोजता येतील इतक्याच खुणा दिसल्या होत्या. मात्र, नंतर ‘ग्राऊंड-पेनिट्रेटिंग रडार’चा वापर केल्यावर अशा 88 पाऊलखुणा असल्याचे दिसून आले. या खुणा प्रौढांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्व वयोगटातील माणसांच्या आहेत. अगदी पाच वर्षांच्या बालकाच्याही पावलांच्या खुणा यामध्ये आहेत.

शेवटच्या हिमयुगाच्या अखेरच्या टप्प्यातील लोकांच्या या पाऊलखुणा आहेत. संशोधिका अन्या किटरमॅन यांनी सांगितले की इतक्या मोठ्या संख्येने प्राचीन मानवांच्या पावलाचे ठसे सापडणे हे ‘आयुष्यातून एकदाच’ घडणार्‍या घटनांपैकी एक आहे. अजूनही या पाऊलखुणांवर संशोधन सुरू असल्याने या शोधाची माहिती कोणत्याही वैज्ञानिक नियतकालिकात शोधनिबंध स्वरूपात दिलेली नाही.

Back to top button