‘बी 12’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने होतात ‘या’ समस्या | पुढारी

‘बी 12’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने होतात ‘या’ समस्या

नवी दिल्ली : ‘व्हिटॅमिन बी 12’ आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या पोषक तत्त्वांपैकी एक आहे. ते तांबड्या रक्तपेशी व डीएनएच्या निर्मितीसाठी तर आवश्यक असतेच, शिवाय मेंदू आणि चेतापेशींच्या विकासासाठीही गरजेचे असते. हे पोषक तत्त्व शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होत नाही. त्यासाठी योग्य आहारच घ्यावा लागतो. त्याच्या कमतरतेने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार जर भोजनातून हे जीवनसत्त्व योग्य प्रमाणात घेतले नाही तर अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने अ‍ॅनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेचीही समस्या निर्माण होते. साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होण्याचा धोका अधिक असतो.

डिप्रेशन, चिडचिडेपणा, विस्मृती अशा अनेक मानसिक समस्या या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने उद्भवतात. अल्झायमरसारखा विस्मृतीशी संबंधित मेंदूचा विकार होण्याचेही ते एक कारण बनू शकते. थकवा, दम लागणे, डोकेदुखी, त्वचा पिवळी पडणे, जीव घाबरा होणे, गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या, लक्ष विचलित होणे अशा समस्याही निर्माण होऊ शकतात. मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, पनीर, टोमॅटो, फळे, सुका मेवा अशा पदार्थांमध्ये हे जीवनसत्त्व आढळते. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या सप्लिमेंटस्ही घेता येतात.

Back to top button