इंदूरच्या तरुणाने शोधले ‘अँड्रॉईड 13’मधील 49 बग! | पुढारी

इंदूरच्या तरुणाने शोधले ‘अँड्रॉईड 13’मधील 49 बग!

इंदूर : मोबाईल फोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक हिस्साच बनलेला आहे. फोनमध्ये आपला वैयक्तिक डेटा असतो जो अन्य कुणालाही समजू नये असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळेच डेटाच्या सुरक्षेबाबत प्रत्येक कंपन्या काळजी घेत असतात. तरीही त्यामध्ये काही त्रुटी राहून जातात. आता लवकरच लाँच होणार्‍या ‘अँड्रॉईड-13’ मध्येही अशाच त्रुटी असल्याचे दिसून आले आहे, ज्याबाबत ‘गुगल’ही अनभिज्ञच होते. इंदूरच्या अमन पांडे या तरुणाने या ‘अँड्रॉईड 13’ मधील असे एक-दोन नव्हे तर 49 बग शोधून काढले आहेत! यापैकी दोन बग यूजरसाठी अतिशय धोकादायक होते.

‘अँड्रॉईड 13’ मध्ये आपल्या परवानगीशिवायच कुणीही आपले लोकेशन मिळवू शकत होते. त्यानंतर आपल्याला ट्रॅक करता येऊ शकत होते. अमन पांडे यांची कंपनी ‘बग्स मिरर’ आता ‘अँड्रॉईड 13’मध्ये सर्वाधिक त्रुटी काढणारी जगातील टॉप बग रिसर्चर बनली आहे. त्यासाठी ‘गुगल’कडून कंपनीला कोट्यवधी रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. ‘गुगल’ याचवर्षी आपल्या यूजर्ससाठी ‘अँड्रॉईड 13’ लाँच करणार आहे. हे अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन आहे.

नवे काही लाँच करण्यापूर्वी ‘गुगल’कडून आपल्या उत्पादनाच्या बीटा आणि अल्फा व्हर्जनला तज्ज्ञांकडे पाठवले जाते. तसेच यामधील त्रुटी शोधून काढण्यास सांगितले जाते. त्यामुळे इंदूरचे टेकी अमन पांडे यांच्याकडेही फेब—ुवारी 2022 मध्ये हे ‘अँड्रॉईड-13’चे बीटा व्हर्जन आले होते. अमन व त्यांच्या टीमने यामधील त्रुटी शोधण्यास सुरुवात केली व तब्बल 49 त्रुटी शोधून काढल्या!

Back to top button