महासागरांचे प्रदूषण ‘वाढता वाढता वाढे’! | पुढारी

महासागरांचे प्रदूषण ‘वाढता वाढता वाढे’!

नवी दिल्‍ली : माणूस जिथे जिथे गेला तिथे त्याने कचरा करून ठेवला. एव्हरेस्टसारखे जगातील सर्वात उंच शिखर असो किंवा समुद्राचा तळ, अगदी अंतराळातही मानवनिर्मित कचरा आहेच! अर्थातच हा कचरा माणसासह सर्वच जीवांना धोकादायक आहे. समुद्र-महासागरांमध्ये सुमारे सव्वा दोन लाख प्रजातींचे जीव राहतात. अशा या ‘रत्नाकरा’चेही प्रदूषण सध्या ‘वाढता वाढता वाढे’ अशा थाटात वाढतच चालले आहे. सागरी जलचरांची सुरक्षाही आता अशा मानवनिर्मित कचर्‍याने, प्रदूषणाने धोक्यात आलेली असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

वातावरणातून आपल्या जितक्या ऑक्सिजनची गरज असते त्याचा निम्मा भाग महासागरांमधूनच प्राप्‍त होत असतो. अर्थात आपण ज्यावेळी ऑक्सिजनचा विचार करतो त्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी झाडेझुडपे आणि जंगलच येत असतात. त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे; पण महासागरही आपल्याला ऑक्सिजन देतात हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय जगभरातील सुमारे तीन अब्ज लोक थेटपणे समुद्रावरच अवलंबून आहेत.

माणसाद्वारे उत्सर्जित कार्बन डायऑक्साईडचा 25 टक्के भाग समुद्रांकडूनच शोषला जातो. सतत वाढणार्‍या लोकसंख्येमुळे महासागरांवर अधिकाधिक कार्बन डायऑक्साईड शोषण्याचा दबाव वाढत आहे. त्यामुळे महासागर अधिकाधिक आम्लयुक्‍त बनत चालले आहेत. त्याचा परिणाम म्हणून समुद्राची इको-सिस्टीमही प्रभावित होत आहे.

अखेरीस हे सर्व पर्यावरणाला प्रभावित करू शकते. सामान्यपणे असा कोणताही पदार्थ जो नैसर्गिक संतुलनामध्ये बाधा उत्पन्‍न करतो, त्याला प्रदूषक म्हटले जाते. वाढत्या प्रदूषणाचे एक मुख्य कारक म्हणजे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा धोकादायक शहरी कचरा. समुद्रांना लोखंड, शिसे, सिंथेटिक फायबर, प्लास्टिक अशा अनेक प्रकारचा कचरा प्रदूषित करीत असतो. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या माहितीनुसार दरवर्षी आठ लाख टन प्लास्टिक समुद्रात प्रवाहित होत आहे. विशेषतः सिंगल यूज प्लास्टिक याबाबत गंभीर समस्या निर्माण करीत आहे. त्यामध्ये स्ट्रॉ, फूड रॅपर, प्लास्टिक बॅग, प्लास्टिक पेले, बाटल्या आदींचा समावेश आहे.

हेही वाचा

Back to top button