‘जेम्स वेब’ने टिपली कार्टव्हील आकाशगंगा | पुढारी

‘जेम्स वेब’ने टिपली कार्टव्हील आकाशगंगा

वॉशिंग्टन ः ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने लाँच होताच कामाचा धडाका लावला आहे. बह्मांडाचे पहिले रंगीत छायाचित्र टिपणार्‍या या अंतराळ दुर्बिणीने आता कार्टव्हील आकाशगंगेचेही नवे छायाचित्र टिपले आहे. यामधून आकाशगंगेचा प्रचंड वेग व तेथील धूळ दिसून येते. यामध्ये अतिशय अनोखी व विविध रंगाची एक कडीही फिरत असताना दिसते. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे की पृथ्वीपासून सुमारे 500 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या दोन आकाशगंगांची धडक होऊन ही रंगीबेरंगी आकाशगंगा बनलेली आहे. ज्याप्रमाणे आपण तलावात दगड फेकल्यानंतर पाण्यात तरंग निर्माण होऊन वलये दिसू लागतात, त्याचप्रमाणे दोन आकाशगंगांची जोरात धडक होऊन एका केंद्रापासून दोन वलयांचा हा विस्तार झाला आहे.

यामधील लहान पांढरी कडी ही आकाशगंगेच्या केंद्राजवळ आहे, तर बाहेरील कडी ही त्याच्या विविध रंगांनी 440 दशलक्ष वर्षांपासून बह्मांडात विस्तारलेली आहे. ही कार्टव्हील आकाशगंगा जसजशी बाहेरील बाजूस विस्तारत जाते, तसे त्याची वायूंमध्ये निर्मिती होऊन, यामधून तार्‍यांची निर्मिती होते. हबल दुर्बिणीने यापूर्वी आकाशगंगेच्या दुर्मीळ प्रतिमा टिपलेल्या आहेत. लहान घुसखोर आकाशगंगा धडकण्यापूर्वी ही आकाशगंगाही आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेसारखीच सर्पिलाकार होती, असे ‘नासा’ने म्हटले आहे. तब्बल 10 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च करून बनवलेली जेम्स वेब दुर्बीण ‘बिग बॅग’नंतर ब—ह्मांडाची व पर्यायाने आकाशगंगांची निर्मिती कशी झाली हे गूढ उकलण्यास मदत करील.

Back to top button