‘कर्क’ चिन्ह असलेल्या रोमन नाण्याचा शोध | पुढारी

‘कर्क’ चिन्ह असलेल्या रोमन नाण्याचा शोध

तेल अवीव : इस्रायलजवळ समुद्रात जाऊन संशोधन करणार्‍या पुरातत्त्व संशोधकांच्या एका पथकाला रोमन काळातील एका नाण्याचा शोध लागला. या नाण्यावर एका बाजूला चंद्राची रोमन देवता लुना व खेकड्याची प्रतिमा अंकित आहे. बारा राशींपैकी कर्क राशीचे प्रतीक असलेला खेकडा या नाण्यावर देवीच्या प्रतिमेच्या खाली दिसून येतो.

रोमन साम्राज्याच्या शांततेच्या काळातील हे नाणे आहे. ते सुमारे 1850 वर्षांपूर्वीचे असून ब्राँझ म्हणजेच कांस्य धातूचे आहे. उत्तर इस्रायलमधील हैफाच्या किनारपट्टीजवळ समुद्रतळाशी हे नाणे सापडले. इस्रायल अँटिक्युटिज अ‍ॅथॉरिटीच्या (आयएए) मेरीटाईम आर्टियोलॉजी युनिटचे संचालक जेकब शर्विट यांनी सांगितले की इस्रायलच्या किनारपट्टीलगत प्रथमच असे नाणे सापडले आहे. इसवी सन 138 ते इसवी सन 161 या काळातील सम्राट अँटोनियस पायसच्या कारकिर्दीत हे नाणे बनवले गेले होते. इसवी सनपूर्व 27 ते इसवी सन 180 पर्यंतचा काळ रोमन साम्राज्यासाठी तुलनेने शांततेचा मानला जातो.

या काळातील काही अखेरच्या सम्राटांमध्ये अँटोनियस पायसचा समावेश होतो. हा राजा प्रादेशिक समस्या सैन्य कारवाईच्या माध्यमातून करण्याऐवजी स्थानिक गव्हर्नर्सच्या माध्यमातून सोडवण्यावर भर देत असे. त्याच्या काळातील हे नाणे ज्योतिष व राशींशी संबंधित एकूण तेरा नाण्यांच्या समूहातील एक आहे. या तेरा नाण्यांपैकी बारा नाणी ही वेगवेगळ्या बारा राशींच्या चिन्हांनी अंकित होती तर तेराव्या नाण्यावर संपूर्ण बारा राशींची चिन्हे अंकित केली होती.

Back to top button