पंजाब मधील १२४ वर्षे वयाच्या महिलेचे निधन | पुढारी

पंजाब मधील १२४ वर्षे वयाच्या महिलेचे निधन

जालंधर ः पंजाब मधील एक महिला 124 वर्षे वयाची असल्याचा दावा करण्यात आला होता. जालंधरच्या लोहिया खासमधील साबूवाल येथे राहणार्‍या या बसंत कौर नावाच्या महिलेचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष म्हणजे इतके दीर्घायुष्य भोगलेल्या या आजीबाईंना गोड खाण्याची आवड होती.

मात्र, त्यांना शुगर किंवा ब्लडप्रेशर (मधुमेह व रक्‍तदाब) यांचा कोणताही त्रास नव्हता! त्यांना कधीही डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता भासली नाही असे त्यांचे कुटुंबीय सांगतात.

अतिशय दीर्घ आयुष्य लाभल्यामुळे त्या म्हणत असत की माझी भावंडे आणि पतीही गेले. मात्र, अजूनही मी जिवंत आहे, कदाचित देव मला विसरूनच गेला असावा. माझे आयुष्य तर कधीच पूर्ण झाले आहे. बसंत कौर यांच्या आयुष्याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येतात. काही नातेवाईकांच्या मते, त्यांचे वय 132 वर्षांचे होते.

मात्र, 1 जानेवारी 1995 मध्ये बनलेल्या मतदार ओळखपत्रात त्यापेक्षा कमी वयाची नोंद आहे. त्यांचा मुलगा सरदारा सिंह 72 वर्षांचे आहेत. ते व त्यांची पत्नी कुलवंत कौर म्हणतात की बसंत कौर यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आम्ही खूश आहोत. वयाच्या अखेरच्या टप्प्यातही त्यांना कोणताही त्रास नव्हता. बुधवारी त्यांनी नेहमीप्रमाणे जेवण केले व पंधरा मिनिटांनी पाणी पिले. त्यानंतर त्यांनी शांतपणे प्राण सोडला. त्यांचे बारा नातू व तेरा नाती आहेत. तसेच आठ परतवंडे आहेत.

या परतवंडांनाही मुले झालेली आहेत. सरकारी रेकॉर्डमध्ये 1 जानेवारी 1995 मध्ये त्यांचे वय 98 वर्षे नोंदवलेले आहे. त्यांचे पती ज्वाला सिंह यांचा 1995 मध्ये वयाच्या 105 व्या वर्षी मृत्यू झाला.

Back to top button