ऑनलाईन मागवलेल्या साहित्यावर अस्वलाचा डल्‍ला! | पुढारी

ऑनलाईन मागवलेल्या साहित्यावर अस्वलाचा डल्‍ला!

न्यूयॉर्क ः अमेरिकेत एका महिलेने ऑनलाईन खरेदी करून मागवलेल्या साहित्याचा बॉक्स एका अस्वलाने तोंडात धरून पळवला!

पर्यटकांच्या हातातील खाऊ पळवणारी माकडं किंवा अगदी आईस्क्रीमवरही डल्‍ला मारणारे सिगल पक्षी नवे नाहीत. मात्र, कधी कधी वन्यप्राणीही माणसाच्या साहित्यावर असाच डल्‍ला मारत असतात. आता अशाच एका प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमेरिकेत एका महिलेने ऑनलाईन खरेदी करून मागवलेल्या साहित्याचा बॉक्स एका अस्वलाने तोंडात धरून पळवला!

कनेक्टिकट येथील बि—स्टलमध्ये ही घटना घडली. एका महिलेने आपल्या घरच्या पत्त्यावर काही सामान मागवले होते. डिलिव्हरी बॉय घराच्या दारातच हा बॉक्स ठेवून निघून गेला. दरम्यान, तिथे एक काळे अस्वल आले आणि त्याने तोंडाने उचलून हा बॉक्स नेला! क्रिस्टिन लेवीन नावाच्या या महिलेने दार उघडून पाहिले तर तिथे हा बॉक्स नव्हता. कुणीतरी बॉक्स चोरला असावा असे वाटून तिने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी तिला धक्‍काच बसला.

चक्‍क एका अस्वलाने आपल्या दारात येऊन आपला बॉक्स पळवला हे पाहून ती भयचकीत झाली. अर्थात या बॉक्समध्ये काही महागडे साहित्य नव्हते तर तिने मागवलेले टॉयलेट पेपर त्यामध्ये होते. अस्वलानेही हा बॉक्स फार लांब न नेता शेजारीच एका ठिकाणी टाकून दिला होता! त्याच्या चोरीचा हा व्हिडीओ मात्र अनेकांनी कुतुहलाने पाहिला.

Back to top button