१२२ वर्षांपूर्वी ‘या’ दोघांनी दिल्‍ली दरबाराचे वेधले होते लक्ष | पुढारी

१२२ वर्षांपूर्वी ‘या’ दोघांनी दिल्‍ली दरबाराचे वेधले होते लक्ष

नवी दिल्‍ली : गिनिज बुकमध्ये जगातील सर्वात उंच अशा हयात आणि दिवंगत लोकांची माहिती मिळते. या लोकांच्या ताडमाड उंचीकडे आणि अवाढव्य देहाकडे पाहून कुणीही अचंबित होऊ शकतो. आपल्या देशातही 122 वर्षांपूर्वी अशी दोन उंच माणसं होती. या दोन काश्मिरी माणसांनी त्यावेळेच्या ब्रिटीश काळातील दिल्‍ली दरबाराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते! 1903 मधील या दिल्‍ली दरबारातील त्यांची छायाचित्रे आजही पाहायला मिळतात.

सोबतच्या छायाचित्रात दोन्ही उंच माणसांमध्ये जो माणूस दिसत आहे तो एक अमेरिकन फोटोग्राफर होता. त्याचे नाव प्रा. जेम्स रिकाल्टन. त्याने या दोघांची अनेक छायाचित्रे टिपली होती. हे दोघे एकमेकांचे भाऊ होते. त्यापैकी एकाची उंची 7 फूट 6 इंच होती तर दुसर्‍याची 7 फूट 9 इंच. बि—टिश राजसिंहासनावर एडवर्ड सप्‍तम स्थानापन्‍न झाल्यानिमित्त त्यावेळी दिल्‍लीत एका विशेष दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

एडवर्ड सातवे या कार्यक्रमासाठी स्वतः येतील असे आधी म्हटले जात होते; पण खुद्द राजानेच येण्यास नकार दिला. त्यावेळी लॉर्ड कर्झन यांनी राजाशिवायच हा कार्यक्रम थाटामाटात करण्याचे ठरवले. त्यासाठीची तयारी दोन वर्षे करण्यात आली होती. 29 डिसेंबर 1902 मध्ये हत्तींच्या मिरवणुकीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्‍लीत मुख्य दरबार भरला. संपूर्ण देशभरातील राजे-महाराजे या कार्यक्रमासाठी आले होते.

ज्यावेळी काश्मीरच्या महाराजांचा काफिला तिथे आला त्यावेळी सर्वांचेच लक्ष त्यांच्या दोन अंगरक्षकांकडे गेले. या महाकाय अंगरक्षकांना पाहून सगळेच थक्‍क झाले. या दरबाराचे हे दोघेजणच सर्वात मोठे आकर्षण बनले होते! आजही जगात केवळ 2800 असे लोक आहेत ज्यांची उंची सात फूट किंवा त्यापेक्षा अधिक आहे.

Back to top button