पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वाढला वेग | पुढारी

पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वाढला वेग

न्यूयॉर्क : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाच स्वतःभोवतीही फिरत असते. त्यामुळेच तिची जी बाजू सूर्याच्या दिशेने येईल तिकडे दिवस व विरुद्ध बाजूला रात्र असते. पृथ्वीचा दिवस-रात्रीचा हा एक दिवस सामान्यपणे 24 तासांचा असतो. मात्र, पृथ्वीला यावर्षी आपले दिवस पूर्ण करण्याची जणू घाईच लागली आहे असे दिसते.

सामान्य गतीने फिरणारी पृथ्वी आता स्वतःभोवती अधिक वेगाने फिरू लागली आहे. चोवीस तासांपेक्षाही कमी वेळेत ती स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करू लागली आहे. 29 जूनला तर इतिहासातील सर्वात छोट्या दिवसाची नोंद झाली. या दिवशी पृथ्वीने नेहमीपेक्षा 1.59 मिलीसेकंद कमी वेळेत आपली प्रदक्षिणा पूर्ण केली.

आण्विक घड्याळाच्या सहाय्याने मिनिट परिवर्तनाचा छडा लावण्यात आला. त्याचा उपयोग आपल्या ग्रहाच्या गतीच्या न्यूनतम विवरणाला मोजण्यासाठी केला जातो. यापूर्वी 2020 मध्ये पृथ्वीच्या वेगाने फिरण्यामुळे जुलै महिना सर्वात छोटा झाला होता. त्यावर्षी 19 जुलैला सर्वात छोटा दिवस चोवीस तासांपेक्षा 1.47 मिलीसेकंद कमी वेळेचा होता. यावर्षी 26 जुलैला पृथ्वीने चोवीस तासांपेक्षा 1.50 मिलीसेकंदातच स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. पृथ्वीचे हे स्वतःभोवतीचे भ्रमण अनेक नैसर्गिक गोष्टींमुळे प्रभावित होत असते. त्यामध्ये पृथ्वीच्या कोअरचा अंतर्गत व बाह्य स्तर, महासागर, भरती किंवा हवामानात होत असलेले बदल यांचा समावेश होतो.

Back to top button