केवळ नागपंचमीला खुले होते ‘हे’ मंदिर! | पुढारी

केवळ नागपंचमीला खुले होते ‘हे’ मंदिर!

उज्जैन : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. या मंदिराच्या शिखरामध्ये नागचंद्रेश्‍वराचे मंदिर आहे. हे मंदिर वर्षातून फक्‍त एकदा म्हणजे नागपंचमीला उघडले जाते. सोमवारी, 1 ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजता विशेष पूजेनंतर हे मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले. या मंदिरात नागांच्या सान्‍निध्यात आसनस्थ झालेले शिव-पार्वती, गणेश तसेच नंदी आणि सिंह ही शिव-पार्वतीची वाहने आहेत.

नागपंचमीला अनेक भाविक या नागचंद्रेश्‍वराचे दर्शन घेतात. मंगळवारी, 2 ऑगस्टला हे मंदिर मध्यरात्री बारा वाजता बंद करण्यात येईल. श्री महाकालेश्‍वर मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रशासक गणेशकुमार धाकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपंचमीला भगवान नागचंद्रेश्‍वरांची त्रिकाल पूजा करण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्री मंदिर खुले केल्यानंतर श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे महंत विनित गिरी महाराज यांनी नागचंद्रेश्‍वराची पूजा केली. त्यानंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरातील मूर्ती अकराव्या शतकातील असून ती नेपाळमधून आणण्यात आली असल्याचे म्हटले जाते. या अत्यंत सुबक मूर्तीमध्ये अनेक नाग दिसून येतात.

Back to top button