मँग्रोव्ह वनस्पतीही लुप्‍त होण्याच्या मार्गावर | पुढारी

मँग्रोव्ह वनस्पतीही लुप्‍त होण्याच्या मार्गावर

नवी दिल्‍ली : मँग्रोव्ह ही उष्ण कटिबंधीय वनस्पती आहे. या वनस्पती एकत्र झाडीच्या स्वरूपात वाढलेल्या असतात. समुद्राच्या भरतीची ठिकाणे, क्षारीय दलदल आणि चिखलाने भरलेल्या किनार्‍यावर या वनस्पती असतात. हवामान बदलाचा सामना करणे, त्सुनामीसारख्या आपत्तीत धोका कमी करणे यासाठी या वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावतात. सागरी अन्‍नसाखळीला मजबूत करण्याबरोबरच पर्यावरणासाठी व अन्यही अनेक बाबींसाठी महत्त्वाच्या ठरणार्‍या या वनस्पतींवरच आता संकट आलेले आहे. विविध मानवी कारणांमुळे ही वनस्पती संकटात आहे.

संयुक्‍त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्वेन्शनच्या एका अनुमानानुसार जगभरातील सुमारे 67 टक्के मँग्रोव्ह आवास नष्ट झाले आहेत किंवा त्यांचा र्‍हास होत आहे. सुंदरबन, भितरकनिका, पिचवरम, चोराओ आणि बाराटांग आदी भारताच्या काही सुंदर मँग्रोव्ह क्षेत्रांपैकी आहेत. आज ही सर्व ठिकाणे संकटग्रस्त मँग्रोव्ह पट्ट्यांमध्ये मोडतात. खार्‍या पाण्याला सहन करू शकणारी ही वनस्पतींची एकमेव प्रजाती आहे.

मँग्रोव्ह हे जैवविविधतेमधील एक अनोखी इकोसिस्टीम आहे ज्यामध्ये शेकडो मासे, सरीसृप, शैवाल, पक्षी आणि सस्तन प्राणीही असतात. भरतीच्या लाटांच्या या वनस्पती अवशोषक असतात व आपल्या गुंतागुंतीच्या मुळ्यांनी मातीची धूप होण्यापासून रोखतात. कार्बन शोषून घेण्याबाबतही या वनस्पती महत्त्वाच्या आहेत.

Back to top button