पन्‍नास वर्षांपासून धगधगणार्‍या ज्वाळा! | पुढारी

पन्‍नास वर्षांपासून धगधगणार्‍या ज्वाळा!

अश्गाबात : जगाच्या पाठीवर निसर्गाचे अनोखे चमत्कार दाखवणारी काही ठिकाणे आहेत. त्यामध्येच तुर्कमेनिस्तानातील एका खड्ड्याचा समावेश होतो. या खड्ड्याला ‘नरकाचे द्वार’ असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे गेल्या 50 वर्षांपासून या खड्ड्यात धगधगणार्‍या ज्वाळा. चुकून कुणी या खड्ड्यात कोसळलेच तर काही सेकंदातच तो भस्मसात होणार हे नक्‍की!

तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून सुमारे 260 किलोमीटरवर काराकुम वाळवंटातील दरवेझ गावात हा खड्डा आहे. जमिनीत असलेल्या मिथेन वायूमुळे ही आग पेटल्याचे सांगितले जाते. सन 1971 पासून या ज्वाळा दिसतात. त्यावेळी सोव्हिएत संघाच्या संशोधकांनी याठिकाणी असलेला मिथेन वायू गोळा करण्यासाठी ड्रील केले होते. एके दिवशी तिथे स्फोट झाला आणि त्यानंतर ‘डोअर ऑफ हेल’ या नावाने प्रसिद्ध झालेला हा खड्डा बनला.

या दुर्घटनेनंतर मिथेन वायू वातावरणात पसरू नये म्हणून संशोधकांनी तिथे आग लावली. ही आग एक-दोन आठवड्यांनंतर विझेल असे त्यांना वाटले होते; पण आजपर्यंत ही आग भडकलेलीच आहे. हा खड्डा 229 फूट रुंद आणि सुमारे 65 फूट खोल आहे. आता हे ठिकाण एक पर्यटनस्थळ बनले आहे. हा खड्डा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.

Back to top button