स्पेस पर्सपेक्टिव्ह कंपनी घडविणार अंतराळ प्रवास | पुढारी

स्पेस पर्सपेक्टिव्ह कंपनी घडविणार अंतराळ प्रवास

ह्यूस्टन : सध्या अनेक अंतराळ संस्था माणसाला अवकाशाचे दर्शन घडवून आणण्याच्या तयारीला लागल्या आहेत. यापैकी एक म्हणजे फ्लोरिडास्थित असलेली ‘स्पेस पर्सपेक्टिव्ह कंपनी’ होय. या कंपनीने मोठ्या बलूनसारख्या दिसणार्‍या आपल्या अंतराळ यानावरील पडदा अखेर हटविला आहे. अवघ्या दोन वर्षांनंतर आपल्या यानात बसून लोक पृथ्वीच्या वातावरणाचा एक थर असलेल्या स्ट्रॅटोस्फियरपेक्षाही वरपर्यंत प्रवास करू शकतील, असे या कंपनीने म्हटले आहे.

‘स्पेस पर्सपेक्टिव्ह कंपनी’च्या यानाचे नाव ‘स्पेसशिप नेपच्यून’ असे आहे. या यानाला काचेच्या मोठ्या खिडक्या असतील. त्यातून अंतराळचे विहंगम द‍ृश्य नजरेस पडेल. कंपनीचे को-सीइओ टॅबर मॅक्यूलम यांनी सांगितले की, ‘स्पेसशिप नेपच्यून’ हे यान अत्यंत साधे, सुरक्षित व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. याचे साधे डिझाईन आणि ऑटोमेशन सिस्टममुळे ते अधिक सुरक्षित आहे. यामधील केबिन रूमध्ये एक रेस्ट रूम असून त्यात टेलिस्कोपही असेल.

‘स्पेसशिप नेपच्यून’ हे गोलाकार यान असून त्यात आठ प्रवासी आणि एक पायलट अंतराळ प्रवासावर जातील. याची सुरुवात 2024 च्या अखेरीस होईल. ते तब्बल एक लाख फूट उंच जाईल. यान पूर्ण अंतराळात जाणार नसले, तरी त्याच्या खालीपर्यंत जाईल. यामुळे प्रवाशांना शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव मिळणार नाही. यासाठी कोट्यवधी खर्च करण्याची गरज नाही. केवळ 1.25 लाख डॉलर्स म्हणजे 99.9 लाख रुपये भरून सहा तासांचा अंतराळ प्रवास लोक करू शकतील. आतापर्यंत 900 लोकांनी तिकिटे खरेदी केली आहेत.

Back to top button