‘नासा’ मंगळावर पाठविणार आणखी दोन हेलिकॉप्टर्स | पुढारी

‘नासा’ मंगळावर पाठविणार आणखी दोन हेलिकॉप्टर्स

वॉशिंग्टन : मंगळभूमीवर सध्या ‘नासा’चे पर्सिव्हरन्स हे रोव्हर आणि ‘इंज्युनिटी’ हे हेलिकॉप्टर (रोटरक्राफ्ट) आपले काम करीत आहे. तेथील खडक व मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी आता ‘नासा’ने मंगळावर आणखी दोन मिनी हेलिकॉप्टर्स पाठविण्याची योजना आखली आहे. या योजनेची नुकतीच ‘नासा’कडून घोषणा करण्यात आली. ‘पर्सिव्हरन्स’ आता ‘डबल ड्यूटी’ करून तेथील दगड-मातीचे नमुने रॉकेटमध्ये ठेवणार आहे. जे आणखी दशकभराने पृथ्वीच्या दिशेने कूच करील.

‘पर्सिव्हरन्स’ने यापूर्वीच मंगळावरील दगडांमध्ये ड्रील करून अकरा नमुने गोळा केलेले आहेत. आता आणखी ड्रिलिंग केले जाणार आहे. अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या मुख्य संशोधिका मीनाक्षी वाधवा यांनी सांगितले की, अलीकडेच ‘पर्सिव्हरन्स’ने एका अशा दगडामध्ये ड्रील करून नमुने घेतले आहेत ज्यामध्ये प्राचीन काळातील मंगळावरील जीवसृष्टीचे पुरावे दडलेले असू शकतात. यापूर्वीच अशा नमुन्यांमध्ये मोठेच वैविध्य पाहण्यात आले आहे. हे सर्व नमुने पृथ्वीवर कधी येतील याचीच प्रतीक्षा आहे. ‘इंज्युनिटी’ हेलिकॉप्टरने आतापर्यंत मंगळावर 29 उड्डाणे केलेली आहेत. गेल्या वर्षीच्या प्रारंभीच हे मिनी हेलिकॉप्टर पर्सिव्हरन्ससोबत मंगळभूमीवर आले आहे.

त्याच्या शानदार कामगिरीमुळेच आता अशी आणखी दोन मिनी हेलिकॉप्टर्स मंगळावर पाठविण्यात येणार आहेत. प्रत्येक हेलिकॉप्टर एका वेळी प्रत्येकी एक सॅम्पल ट्यूब उचलून रॉकेटमध्ये ठेवण्यासाठी डिझाईन केले जाईल. अशा पद्धतीने सर्व ट्यूब रॉकेटमध्ये ठेवल्या जातील व हे रॉकेट तेथून पृथ्वीवर येईल. सर्व काही सुरळीत पार पडले तर असे 30 नमुने घेऊन रॉकेट 2031 मध्ये मंगळावरून उड्डाण करेल आणि ते 2033 मध्ये पृथ्वीवर पोहोचेल.

Back to top button