जगात 2030 पर्यंत डिमेन्शियाचे 7.8 कोटी लोक | पुढारी

जगात 2030 पर्यंत डिमेन्शियाचे 7.8 कोटी लोक

नवी दिल्‍ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात सध्या 5.5 कोटी लोक डिमेन्शियाने ग्रस्त आहेत. त्यापैकी 60 टक्के रुग्ण हे कमी किंवा मध्यम उत्पन्‍न असलेल्या देशांमध्ये राहतात. 2030 पर्यंत रुग्णांची संख्या वाढून 7.8 कोटी होऊ शकते. तसेच 2050 पर्यंत हा आकडा 13.9 कोटीपर्यंत पोहोचू शकतो.

उतारवयात होणार्‍या मेंदूच्या आजारांमध्ये डिमेन्शिया या विस्मृतीशी संबंधित आजाराचा समावेश आहे. यामध्ये माणसाला केवळ विस्मरणच होऊ लागते असे नाही तर मेंदू व शरीराचा ताळमेळ साधणेही कठीण होऊन बसते. त्यामुळे रुग्णाला अर्थातच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित 24 पेक्षा अधिक शोधनिबंधांच्या विश्‍लेषणावरून असे दिसून येते की जर दैनंदिन कामांमध्ये काही बदल केले तर त्याचा धोका 35 टक्क्यांपर्यंत घटवला जाऊ शकतो. डिमेन्शिया विकसित होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे बहिरेपणा. कमी ऐकू येत असल्याने व्यक्‍ती सामाजिक स्तरावर कमी मिसळू लागतो. त्यामुळे मेंदूची समन्वयाची क्षमता घटते व स्मरणशक्‍तीही मंदावू लागते. रक्‍तदाब नियंत्रित नसेल तर हृदयाची काम करण्याची क्षमता प्रभावित होते. त्यामुळे फ्री रॅडिकल्स वाढू लागतात. त्यामुळे तणाव व इम्फ्लेमेशन वाढते जे न्यूरॉन्सचे नुकसान करते. त्यामुळे मेंदूची क्षमता प्रभावित होऊ लागते. मधुमेह बळावला असेल तर त्यामुळेही मेंदूच्या पेशी क्षतिग्रस्त होतात व डिमेन्शिया विकसित होतो.

Back to top button