सस्तन प्राण्यांचे पूर्वज कधी बनले उष्ण रक्ताचे? | पुढारी

सस्तन प्राण्यांचे पूर्वज कधी बनले उष्ण रक्ताचे?

लंडन : सस्तन प्राणी आणि पक्षी शरीराची उष्णता स्वतः उत्पन्न करून शरीराचे तापमान नियंत्रित करू शकतात. या प्रक्रियेला उष्माशोषी (एंडोथर्मी) किंवा रक्त गरम होण्याची प्रक्रिया म्हटले जाते. त्यामुळे सस्तन प्राण्यांना जगाच्या पाठीवरील कोणत्याही हवामानात राहता येऊ शकते.

उष्ण रक्त असलेले प्राणी थंड रक्ताच्या प्राण्यांच्या तुलनेत दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळी अधिक सक्रिय राहू शकतात. मात्र, सस्तन प्राण्यांमध्ये अशी उष्माशोषी प्रक्रिया कधीपासून सुरू झाली हे आतापर्यंत नीट माहिती नव्हते. आता याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे.

वैज्ञानिकांनी हे गूढ स्वतःचे अध्ययन, दक्षिण आफ्रिकेतील कारू क्षेत्रात सापडलेले जीवाश्म आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या मिलाफातून उलगडले आहे. सुमारे 23.3 कोटी वर्षांपूर्वी ट्रायसिक काळाच्या उत्तरार्धात सस्तन प्राण्यांच्या पूर्वजांमध्ये उष्माशोषी प्रक्रिया सुरू झाली असे या संशोधनातून आढळून आले. सस्तन प्राण्यांमध्ये उष्माशोषी प्रक्रियेची उत्पत्ती जीवाश्म विज्ञानाच्या रहस्यांपैकी एक होती. त्याचा उलगडा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यात आला.

उष्माशोषिता त्या काळात विकसित झाली ज्यावेळी सस्तन प्राण्यांच्या शरीरातील काही अन्य वैशिष्ट्येही विकसित होत होते. उष्ण रक्त हे सस्तन प्राण्यांमधील स्वरूपाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सस्तन प्राण्यांच्या उत्पत्तीआधी सुमारे 3.3 कोटी वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांमध्ये उष्माशोषी प्रक्रिया आढळल्याचे आता संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Back to top button