कोंबड्याच्या तेराव्याचे जेवण! | पुढारी

कोंबड्याच्या तेराव्याचे जेवण!

लखनौ :  कोंबड्याचे जेवण जेवणारे अनेक असतात; पण कोंबड्याच्या तेराव्याचे जेवण जेवणारे कितीजण आहेत? उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये तब्बल 500 लोकांनी एका कोंबड्याच्या तेराव्याचे जेवण घेतले! तेथील डॉ. शालिकराम सरोज यांचा ‘लाली’ नावाचा कोंबडा कुत्र्याशी झालेल्या झटापटीत मरण पावल्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करून त्याचा तेरावाही घालण्यात आला!

प्रतापगड जिल्ह्यातील बेहदौल कला नावाच्या गावात डॉ. शालिकराम यांचे क्लिनिक आहे. त्यांनी एक शेळी आणि एक कोंबडा पाळला होता. आपल्या या पाळीव प्राण्यांवर त्यांचा अतिशय जीव होता. 8 जुलैला त्यांच्या शेळीच्या करडूवर एका कुत्र्याने हल्ला केला. हे पाहून लाली कोंबडा त्याला सोडवण्यासाठी कुत्र्याशी झटापट करू लागला. या झटापटीत करडू तर वाचले; पण कुत्र्याच्या हल्ल्यात लाली स्वतः गंभीर जखमी झाला आणि 9 जुलैच्या सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले व अगदी मूंडणापासूनचे सर्व विधीही झाले.

बुधवारी सकाळी त्याच्या तेराव्याचे जेवण घालण्यात आले. सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहापर्यंत पाचशेहून अधिक लोकांनी जेवण केले. डॉ. शालिकराम यांची मुलगी अनुजा यांनी सांगितले की लाली कोंबडा माझ्या भावासारखा होता. रक्षाबंधनला त्याला राखीही बांधली जायची. त्याच्या मृत्यूनंतर घरात शोकाकूल वातावरण होते व दोन दिवस घरात अन्न शिजले नाही. त्याच्या तेराव्यासाठी डॉक्टरांनी 40 हजार रुपये खर्च केला!

Back to top button