मंगळावर रोव्हरला दिसली रहस्यमय वस्तू! | पुढारी

मंगळावर रोव्हरला दिसली रहस्यमय वस्तू!

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरला मंगळभूमीवर एक रहस्यमय वस्तू दिसली. धाग्यांचा गुंता असावा अशा स्वरूपाची ही वस्तू होती. रोव्हरच्या फ्रंट लेफ्ट हॅजर्ड अव्हॉयडन्स कॅमेर्‍याने 12 जुलैला या हलक्या रंगाच्या गूढ वस्तूचे छायाचित्र टिपले होते.

हा फोटो समोर येताच अनेक लोकांनी ही वस्तू स्पाघेट्टीसारखी (नूडल्ससारखा इटालियन पदार्थ) दिसते असे म्हटले. मात्र ‘नासा’च्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की ही वस्तू म्हणजे रोव्हरच्या लँडिंगशी संबंधित एखादी वस्तू असावी. कॅलिफोर्नियाच्या पासाडेनामधील ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीतील पर्सिव्हरन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की धाग्यासारखी दिसणारी ही वस्तू रोव्हर किंवा त्याच्या डिसेंट स्टेजशी निगडीत असू शकते. डिसेंट स्टेजमध्ये छोटे छोटे रॉकेट बूस्टर असतात जे खाली येत असलेल्या रोव्हरचे लँडिंग सोपे बनवतात जेणेकरून ते ग्रहाच्या पृष्ठभागाला धडकू नये.

ज्याठिकाणी ही धाग्यासारखी वस्तू दिसली आहे तिथे पर्सिव्हरन्स यापूर्वी गेलेले नव्हते हे विशेष. त्यामुळे वार्‍याबरोबर ती याठिकाणी उडून आलेली असावी असे मानले जात आहे. सध्या पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावरील जेझेरो क्रेटर असे नाव दिलेल्या विशाल विवरात जीवसृष्टीचा शोध घेत आहे.

Back to top button