मेक्सिकोमधील पिरॅमिडही आहेत रहस्यमय! | पुढारी

मेक्सिकोमधील पिरॅमिडही आहेत रहस्यमय!

कैरो : ‘पिरॅमिड’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर इजिप्‍तमधील पिरॅमिडच उभे राहतात. मात्र, जगात अन्यही काही ठिकाणी पिरॅमिडसारखी रचना आढळते. गिझाच्या पिरॅमिडप्रमाणेच तेही प्राचीन काळातील रहस्ये आपल्या उदरात घेऊन उभे आहेत. त्यामध्येच मेक्सिको तील ‘ग्रेट पिरॅमिड ऑफ चोलुला’चा समावेश होतो.

इजिप्‍तमधील गिझाच्या पिरॅमिडबाबत आजही नवे नवे संशोधन होत असते. हजारो वर्षांपूर्वीच्या या पिरॅमिडची रहस्ये उलगडण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. मेक्सिको तील ‘चोलुला’ पिरॅमिडचेही रहस्य उलगडण्याबाबत संशोधक प्रयत्नशील असतात. हा मोठा पिरॅमिड प्राचीन काळात कसा बनवला असावा याचेही संशोधकांना कुतुहल वाटते. मेक्सिकोच्या या पिरॅमिडची गणना जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या पिरॅमिडमध्ये केली जाते. त्याची निर्मिती कोणी केली होती हे आजही एक गूढच आहे.

ख्रिस्तपूर्व सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात या पिरॅमिडच्या उभारणीस प्रारंभ झाला असे मानले जाते. या पिरॅमिडच्या आसपास अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ‘ग्रेट पिरॅमिड ऑफ चोलुला’ हा ‘क्‍वेत्झालकोट’ या देवतेला समर्पित आहे. एके काळी हा पिरॅमिड स्थानिक लोकांच्या आस्थेचे केंद्र होते. संपूर्ण देशातून अनेक भाविक याठिकाणी पूजाअर्चा करण्यासाठी येत असत. स्पेनची एक वसाहत बनण्यापूर्वी चोलुला शहराची लोकसंख्या सुमारे एक लाख होती.

स्पेनची वसाहत बनल्यानंतर मेक्सिकोच्या लोकांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. हे बंड चिरडून टाकण्यासाठी स्पेनने मोठ्या प्रमाणात नरसंहार केला. त्या काळात अनेक प्राचीन मंदिरेही नष्ट करण्यात आली. 1930 पासून आतापर्यंत या पिरॅमिडचे रहस्य उलगडण्यासाठी अनेक वेळा उत्खनन करण्यात आले आहे. या पिरॅमिडमध्ये अनेक रहस्यमय भुयारेही आहेत.

Back to top button