थायलंडमध्येही आहे ‘सोन्याची नदी’! | पुढारी

थायलंडमध्येही आहे ‘सोन्याची नदी’!

बँकॉक : काही जलाशयांमध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहात सोन्याच्या खनिजांचे कण मिसळलेले असतात. असे कण अनेक लोक गोळाही करीत असतात. झारखंडमधील सुवर्णरेखा किंवा स्वर्णरेखा या नावाने ओळखली जाणार्‍या नदीच्या पात्रातही असे सोन्याचे कण आढळतात.  सोन्याच्या खाणीजवळूनच ही नदी वाहत असल्याने असे सोन्याचे कण आढळत असल्याचे म्हटले जाते. थायलंड मध्येही अशीच एक ‘सोन्याची नदी’ आहे. तिच्या पात्रातील सोने गोळा करण्यासाठीही काठावरील गावांमध्ये राहणारे लोक येत असतात.

केवळ स्थानिक लोकच नव्हे तर दूरवरचे लोकही या नदीच्या पात्रातील सोन्याचे कण शोधण्यासाठी येतात. ही नदी ‘गोल्ड माऊंटन’ नावाच्या डोंगराळ भागातून वाहते. हा भाग दक्षिण थायलंड मध्ये येतो. त्याची सीमा मलेशियाजवळ आहे. या भागातही प्राचीन काळापासूनच सोन्याच्या खाणी आहेत. त्यामुळे नदीच्या प्रवाहातही सोन्याचे कण मिसळलेले असतात.

आसपासचे लोक नदीचे पाणी गाळून किंवा पात्रातील चिखल तपासून हे कण गोळा करतात. ही नदी त्यामुळेच अनेक स्थानिकांच्या उपजीविकेसाठी सहायक ठरली आहे. तेथील एका महिलेने म्हटले आहे की नदीजवळ केवळ पंधरा मिनिटे मेहनत घेतली तरी सुमारे 244 रुपयांची कमाई होते! अशाप्रकारे ही नदी त्यांच्यासाठी ‘जीवनदायिनी’च नव्हे तर ‘सुवर्णदायिनी’ही ठरली आहे.

Back to top button