डुलकी काढण्यासाठी ‘नॅप बॉक्स’! | पुढारी

डुलकी काढण्यासाठी ‘नॅप बॉक्स’!

टोकियो : हल्ली कशाच्या सुविधा येतील हे काही सांगता येत नाही. चक्क आत्महत्येसाठीचेही बॉक्स जगाच्या पाठीवर तयार झालेले आहेत. आता जपानमध्ये डुलकी काढण्यासाठी ‘नॅप बॉक्स’ बनवले आहेत. कामाच्या ठिकाणी घटकाभर डुलकी काढून ‘फ्रेश’ होण्यासाठीचे हे नॅप बॉक्स आहेत. सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात माणसाला घटकाभर विश्रांती घेणेही दुरापास्त झाले आहे.

अनेक कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण असतो तसेच आपले काम अधिक चांगले व्हावे यासाठीचा दबावही असतो. कामाच्या रहाटगाडग्यात माणूस नीट झोपूही शकत नाही. ही समस्या जपानमध्ये अधिक आहे. तिथे कामाचे तास अधिक असल्याने कर्मचार्‍यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. आता या समस्येवर जपानच्याच इटोकी आणि कोयोजू गोहन यांनी उपाय शोधला आहे. या दोघांनी देशात एक हेल्दी ऑफिस कल्चर आणण्यासाठी एक व्हर्टिकल म्हणजेच उभा ‘नॅप बॉक्स’ बनवला आहे. या दोघांची भागीदारी एका बिझनेस मॅचिंग इव्हेंटमधून सुरू झाली.

टोकियोत राहणारा फर्निचर तज्ज्ञ इटोकी आणि होक्काइडोचा प्लायवूड पुरवठादार असलेला कोयोजू गोहन या कार्यक्रमात एकमेकांना भेटले आणि दोघांनी ही संकल्पना साकार करण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले की जपानमध्ये असे अनेक कर्मचारी आहेत जे थोड्या विश्रांतीसाठी स्वतःला बाथरूममध्ये कोंडूृन घेतात जे आरोग्यासाठी ठीक नाही. त्यांना घटकाभर विश्रांती घेता यावी, एक डुलकी काढता यावी यासाठी हे खास नॅप बॉक्स बनवले आहे.

Back to top button