‘नासा’ आता युरेनसवर पाठवणार यान? | पुढारी

‘नासा’ आता युरेनसवर पाठवणार यान?

वॉशिंग्टन : आपल्या सौरमंडळातील मंगळ आणि शनी या दोन ग्रहांवर सर्वाधिक संशोधन झालेले आहे. आता वैज्ञानिकांचे पुढील लक्ष्य आहे युरेनस. अमेरिकन राष्ट्रीय विज्ञान अकादमीने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ‘नासा’कडे युरेनस ग्रहावर यान पाठवण्याचा आग्रह करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये पुढील दशकात युरेनसला ‘फ्लॅगशिप प्रोग्राम’मध्ये ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही अ‍ॅकॅडमी दर दहा वर्षांमध्ये ग्रहांच्या शोधात अमेरिकन प्राधान्यांबाबत एक रिपोर्ट प्रकाशित करते. प्रत्येक दशकाच्या सर्वेक्षणात या रिपोर्टचा प्रभाव अधिक असतो. याचा अर्थ आता ‘नासा’वर युरेनस मोहीम सुरू करण्याबाबत दबाव आहे. या रिपोर्टमुळे युरेनसबाबत रस असलेले लोक खूश आहेत. लिसेस्टर विद्यापीठाचे खगोल शास्त्रज्ञ प्रा. लेह फ्लेचर यांनी सांगितले की ही एक चांगली खबर आहे. सौरमंडळात काही अशी ठिकाणे आहेत ज्यांच्याबाबत आपण युरेनसइतकेच किंवा त्यापेक्षाही कमी जाणतो.

आतापर्यंत अगदी प्लुटोबाबतही मोहीम झाली आहे तर युरेनसचीही एक मोहीम झाली पाहिजे. जर्मन-बि—टिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शेल यांनी 13 मार्च 1781 मध्ये युरेनसचा शोध लावला होता. या ग्रहाला सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या 84 वर्षांइतका काळ लागतो. विशेष म्हणजे युरेनसचा केवळ एकच भाग सूर्याच्या दिशेने असतो. 1986 मध्ये ‘व्होएजर-2’ हे यान या ग्रहाजवळून गेले होते.

Back to top button