पावसाळ्यात कसा असावा आहार? | पुढारी

पावसाळ्यात कसा असावा आहार?

नवी दिल्ली : ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ हे खरेच आहे आणि त्याचबरोबर ‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असे सांगण्याचीही वेळ येते हेही खरेच आहे! आरोग्य सांभाळायचे असेल तर आधी आपला आहारही सांभाळावा लागतो. पावसाळ्यात आजारांचा धोका वाढतो आणि या ऋतूत निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे ठरते. त्यासाठी खाण्या-पिण्याची कोणती काळजी घ्यावी याबाबतही आहारतज्ज्ञांनी काही सल्ले दिलेले आहेत.

पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा. सर्दी, खोकला, पोट बिघडणे अशा समस्या दूर ठेवण्यासाठी पोषक आहार घ्यावा. अधिकाधिक पाणी प्यावे आणि स्वतःला हायड्रेट ठेवावे. यासाठी आवळा, लिंबूपाणी, नारळपाणी व कोरफडीचा रस घ्यावा. या ऋतूत स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. फळे व भाज्या वापरण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून स्वच्छ करावे. तीन तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाऊ नये.

केळी, पपई, ताजे रस यांचे सेवन करावे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. न्याहरीत तृणधान्ये, डाळ, दही, मुगाच्या डाळीचे थालीपीठ, फ्रूट चाट यांचा समावेश करता येऊ शकेल. नाश्त्यात तेलकट खाणे टाळावे. दुपारच्या जेवणात चपाती, मसूर, भाज्या, दही, कोशिंबीर हे पदार्थ चांगले. फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेटस् आणि जीवनसत्त्वे असलेला आहार घ्यावा. रात्रीचे जेवण हलके म्हणजेच खिचडी, वरण असे असावे.

Back to top button