ड्रोनचा विक्रम; सलग 26 दिवस केले उड्डाण | पुढारी

ड्रोनचा विक्रम; सलग 26 दिवस केले उड्डाण

सॅक्रामँटो : सर्वसामान्यपणे कोणतेही ड्रोन काही तासांसाठी उड्डाण करू शकते. मात्र, अमेरिकेच्या एका ड्रोनने सलग 26 दिवस उड्डाण करण्याचा विक्रम नोंदविला आहे. माणसाच्या कसल्याही मदतीविना इतका काळ उड्डाण करण्याचा हा एक नवा विक्रमच आहे. यामुळे ड्रोनची निर्मिती करणारे इंजिनिअर्सही चकित झाले आहेत. आता ते ड्रोनकडून मिळालेल्या डाटाचे विश्लेषण करत आहेत. या उड्डानादरम्यान त्यांनी ड्रोनचे ऑनलाईन ट्रॅकिंग केले, जेणेकरून ते कोठेही भटकू नये.

‘जेफिर हाई अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म स्टेशन’ असे या ड्रोनचे नाव आहे. युरोपियन विमान कंपनी ‘एअरबस’ने त्याची निर्मिती केली आहे. जेफिरने 11 जुलै 2022 रोजी सलग 26 दिवस उड्डाण करण्याचा विक्रम पूर्ण केला. या काळात ते सौरऊर्जेवर चार्ज होत उड्डाण करत राहिले. आपल्या प्रवासात एरिझोना ते बेलिज हे अंतर पूर्ण केले व ते अमेरिकेला परत आले. या ड्रोनने ‘कोफा नॅशनल वाईल्डलाईफ रेंज’ येथे प्रवासाचा शेवट केला.

एअरबसच्या इंजिनिअर्सनी जेफिरकडून मिळालेल्या डाटाचे विश्लेषण केले, त्यावेळी असे स्पष्ट झाले की, या ड्रोनने आपल्या संपूर्ण प्रवासादरम्यान ‘यूएसए’ आणि ‘26’ हे दोन शब्द लक्षात ठेवले होते. हे एक अत्यंत हलके ड्रोन असले तरी त्याचे पंख एकूण 82 फूट रुंद असून वजन केवळ 75 किलो इतके आहे. हे एक सौरऊर्जेवर संचालित होणारे ‘इलेक्ट्रिक ड्रोन’ आहे. त्याने 26 दिवसांच्या उड्डाणदरम्यान 67 हजार 700 फूट इतकी उंची गाठली. एखादे नागरी विमानही इतकी उंची गाठू शकत नाही.

Back to top button