क्षणार्धात रंग बदलणारा ऑक्टोपस | पुढारी

क्षणार्धात रंग बदलणारा ऑक्टोपस

लंडन : रंग बदलणारा सरडा आपल्या माहितीचा असतो; पण समुद्रांच्या न्यार्‍या दुनियेत ऑक्टोपस नावाचा जलचरही असाच क्षणार्धात अवतीभोवतीच्या स्थितीनुसार शरीराचा रंग व पोत बदलत असतो. अशाच एका ऑक्टोपसचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून रंग बदलण्याची व आजुबाजूच्या वातावरणात बेमालूम मिसळून जाण्याची त्याची क्षमता दिसून येते.

‘वंडर ऑफ सायन्स’ने ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 23 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक ऑक्टोपस आजुबाजूच्या स्थितीनुसार रंग बदलत असताना दिसून येतो. तो स्वतःला सीशेलसारख्या रूपात बदलेपर्यंत कॅमेरा त्याच्या आजुबाजूला फिरतो. हा व्हिडीओ 2.3 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओ कॅप्शनमध्ये निक रूबर्गला श्रेय देण्यात आले आहे. मूळात व्हायरल हॉगद्वारे 2016 मध्ये पोस्ट केलेला हा व्हिडीओ पुन्हा एकदा आता व्हायरल झाला आहे.

Back to top button