जेवणात पुन्हा मीठ टाकल्यास वाढतो ‘हा’ धोका | पुढारी

जेवणात पुन्हा मीठ टाकल्यास वाढतो 'हा' धोका

वॉशिंग्टन : अनेकांना खाद्यपदार्थांवर पुन्हा एकदा वरून मीठ भुरभुरण्याची सवय असते. अशी सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. खाद्यपदार्थांवर पुन्हा एकदा असे वरून मीठ टाकल्याने पुरुषांच्या आयुर्मानात दोन वर्षांची आणि महिलांच्या आयुर्मानात दीड वर्षाची घट येऊ शकते. ब्रिटनमध्ये 50 वर्षांच्या वयाच्या आसपासच्या पाच लाख लोकांची नऊ वर्षे पाहणी करून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

ज्या लोकांनी जेवणात अतिशय कमी मीठ वापरले किंवा वरून मीठ टाकले नाही अशा लोकांच्या तुलनेत नेहमी मीठ मिसळणार्‍यांच्या लवकर मृत्यूचा धोका 28 टक्क्यांपर्यंत वाढतो. अमेरिकेच्या न्यू ओरलिंस येथे ट्यूलँड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्राध्यापक लू की यांनी सांगितले की जेवणात पुन्हा एकदा मीठ टाकून खाणार्‍या लोकांच्या लवकर मृत्यूचा धोका संभवतो.

याबाबतचा संबंध या पाहणीतून दिसून आला आहे. या संशोधनासाठी युके बायो बँक स्टडीच्या पाच लाख लोकांची सरासरी नऊ वर्षांपर्यंत पाहणी करण्यात आली. 2006 पासून 2010 पर्यंत या पाहणीत सहभागी असलेल्या लोकांना विचारण्यात आले की ते खाद्यपदार्थांवर वरून मीठ टाकतात का व ते असे किती वेळा करतात? जेवण शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकणे ही एक सामान्य क्रिया आहे व त्याचा या पाहणीत समावेश करण्यात आला नाही. मात्र, तयार पदार्थांवर पुन्हा एकदा चवीसाठी वरून मीठ टाकणे धोकादायक ठरू शकते.

Back to top button