जयसिंगपूर : कुटुंबासह सुरक्षितस्थळी स्थलांतर करा! | पुढारी

जयसिंगपूर : कुटुंबासह सुरक्षितस्थळी स्थलांतर करा!

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. पावसाचे पाणी वाढत असल्याने नदीकाठांवरील सर्वच गावांना काळजी घेण्याची गरज आहे. संसारोपयोगी साहित्य, जनावरे व कुटुंबीयांना घेऊन सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हा, शासन तुमची सर्व जबाबदारी घेईल, जनावरांच्या चार्‍याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करून महापुरात अडकू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूरग्रस्तांना केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. पाखरे यांच्यासह महावितरण, एस.टी., बांधकाम यांसह सर्व विभागांच्या पथकाने बुधवारी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी रेखावर बोलत होते.

जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख 30 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, महाराष्ट्र-कर्नाटक पाटबंधारे विभागाचे काम समन्वयाने सुरू आहे. 2019 व 2021 च्या आलेल्या महापुराचा अंदाज बांधत आपण महापूर भागात थांबू नये. प्रशासनाने उपलब्ध केलेल्या निवारास्थळी गरजेच्या वस्तू व जनावरे घेऊन जाण्याची गरज आहे. जे पूरग्रस्त आता शासनाच्या कॅम्पमध्ये दाखल होण्यास इच्छुक आहेत, त्यांनी दाखल व्हावे. त्यांची शासन जबाबदारी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी रेखावर यांच्या पथकाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथेही मंदिर परिसराची पाहणी केली. त्यानंतर शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात व श्री दत्त कारखाना, उदगाव कुंजवन, जयसिंगपूर येथील झेले हायस्कूल व कन्या महाविद्यालय येथे महापूर निवारा स्थळाचीही पाहणी करून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

गुरुदत्त कारखाना पूरग्रस्तांच्या पाठीशी : माधवराव घाटगे

टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे गुरुदत्त शुगर्स येथे 25 हून अधिक गावांतील 9 ते 11 हजार पूरग्रस्तांची सोय केली जाते. गुरुदत्तकडून त्यांच्या जेवण व जनावरांच्या चार्‍याचीही व्यवस्था आजपर्यंत केली आहे. संभाव्य महापुराचे संकट ओढवल्यास या संकट काळात गुरुदत्त कारखाना पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील. जिल्हा प्रशासनाने फक्त फिरत्या शौचालयांची सोय करून द्यावी, अशी मागणी गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे यांनी केली. यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कुरुंदवाड परिसराची पाहणी

कुरुंदवाड : संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन कृष्णा-पंचगंगा नदीकाठच्या पूरग्रस्तांनी वेळीच सावध होऊन स्थलांतराच्या दृष्टिकोनातून तयारीला लागावे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड, टाकळीवाडी येथील निवारा केंद्रांची जिल्हाधिकारी रेखावर यांनी पाहणी केली. पूरग्रस्तांसाठी शौचालयांची गैरसोय होऊ नये यासाठी फिरते शौचालय ठेवावे, अन्नधान्य व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून योग्य साठा उपलब्ध करून ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे यांनी निवारा केंद्रांतील नियोजित सोयीसुविधांचा आराखडा सादर केला. प्रांतधिकारी डॉ.विकास खरात यांनी तालुक्यातील पूरस्थितीची माहिती दिली. गट विकास अधिकारी शंकर कवितके, सपोनि बालाजी भांगे, मुख्याधिकारी निखिल जाधव आदी उपस्थित होते.

कवठेगुलंद येथे सात गावांचा आढावा

कवठेगुलंद : नदीपलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी या सात गावांतील नागरिकांची सोय कवठेगुलंद (ता.शिरोळ) येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूल माळभागावर केली जाते. दरम्यान, जिल्हाधिकारी रेखावर यांनी पूरस्थितीत कुटुंबांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे का, याची पाहणी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश शहापुरे यांनी उपलब्ध निवारास्थळांची माहिती दिली.

निवारास्थळांचे नियोजन करा

शिरोळ तालुक्यात तीन शहरांबरोबर 42 गावांना महापुराचा फटका बसतो. पूरग्रस्त निवारास्थळांमध्ये येण्यापूर्वी सर्व सुविधा उपलब्ध करा. जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था, पूरग्रस्तांच्या राहण्याची व जेवणाची सोय, विशेषत: आरोग्य विभागाने संकट काळात साथीचे रोग पसरू नयेत यासाठी दक्ष राहावे, असेही रेखावार यांनी सांगितले. त्याचबरोबर बांधकाम विभागाने महापुरातून बाहेर पडणारे रस्ते तातडीने भरून घ्यावेत. महावितरणने बुडीत भागाकडे विशेष लक्ष ठेवावे. ज्या गावांत पूर येतो, त्या गावांतील पूरग्रस्तांना स्थलांतरासाठी कुरुंदवाड आगाराने एस.टी. उपलब्ध करावी; शिवाय प्रत्येक निवारास्थळात एस.टी.बसेस सज्ज ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सर्व प्रशासनाला दिले.

Back to top button