कार्बनडाय ऑक्साईड घटविण्यास केवळ वृक्षारोपण पुरेसे नाही | पुढारी

कार्बनडाय ऑक्साईड घटविण्यास केवळ वृक्षारोपण पुरेसे नाही

मेलबोर्न : जगात सध्या जलवायू परिवर्तन समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी वातावरणातील कार्बनडाय ऑॅक्साईडचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या समस्येची दाहकता कमी करण्यासाठी 2050 पर्यंत वातावरणातून अब्जावधी टन कार्बनडाय ऑक्साईड हटविण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याची सूचना केली जात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असले तरी म्हणावे तसे परिणाम मिळेनासे झाले आहेत.

जलवायू परिवर्तन, वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगबाबत करण्यात येणार्‍या संशोधनाचे निष्कर्ष चिंतित करणारे ठरत आहेत. जगभरातील अनेक देशांनी पॅरिस करारान्वये कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ते म्हणजे या शतकाच्या मध्यावधीपर्यंत वातावरणातील अब्जावधी टन कार्बनडाय ऑक्साईड हटविणे होय; पण यासाठी केवळ वृक्षारोपण हा पर्याय पुरेसा नाही, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे.

आइसलँडची ‘कार्बफिक्स’ नामक कंपनी वातावरणातून कार्बनडाय ऑक्साईड शोषूण घेत त्याला खोल जमिनीत पोहोचवून त्याचे दगडात रूपांतर करण्यासंबंधी प्रयोग करत आहे. या संशोधनाचे प्रमुख हॅलगॅसन यांनी सांगितले की, वातावरणात सध्या कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. यामुळे या वायूला हटविण्याचे काम केवळ झाडे करू शकणार नाहीत. यासाठी दुसर्‍या अनेक पर्यायी उपायांची आवश्यकता आहे. याशिवाय जगात दरवर्षी सुमारे 15 अब्ज झाडे तोडली जातात आणि केवळ 5 अब्ज झाडे लावली जातात. यामुळे झाडांची संख्या कमी होत आहे. या असमान संख्येचाही वातावरणावर परिणाम होत आहे.

Back to top button