धोक्याच्या जाणिवेने सुरवंट बनतो साप | पुढारी

धोक्याच्या जाणिवेने सुरवंट बनतो साप

कॅलिफोर्निया : निसर्गात असे असंख्य जीव आहेत की, त्यांच्याबाबतचे गूढ आजच्या प्रगत विज्ञानालाही उलगडलेले नाहीत. काही जीव आपली शिकार होण्यापासून बचाव करण्यासाठी स्वतःला आसपासच्या परिसराशी तंतोतंत जुळवून घेतात. असाच एक विचित्र जीव आहे की, तो धोक्याची जाणीव होताच धोकादायक साप बनतो व सापासारखे वागू लागतो. हेमरोप्लेन्स ट्रिप्टोलेमस मॉथ असे त्याचे नाव. खरेतर हा एक सुरवंट (कॅटरपिलर) प्रजातीमधील आहे.

सिंगीडे फॅमिलीमधील हा जीव प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि मध्य अमेरिकेतील अनेक ठिकाणी आढळतो. आपल्या जीवाला धोका आहे, याची जाणीव होताच तो स्वतःला सापामध्ये बदलतो; जेणेकरून कोणताही शिकारी जवळ येऊ नये, तसेच तो घाबरून दूर जावा. उल्लेखनीय म्हणजे हुबेहूब सापाच्या तोंडासारखा दिसणारा भाग हा या सुरवंटाचा पाठीमागचा भाग असतो, तर खरेखुरे तोंड झाडाच्या फांदी अथवा पानाला चिकटलेले असते.

उल्लेखनीय म्हणजे हा कॅटरपिलर धोक्याच्या जाणिवेने केवळ सापच बनत नाही, तर सापासारखा व्यवहारही करू लागतो. एखादा शिकारी जीव जवळ येताच हा कॅटरपिलर पाठीमागच्या भागाला सापाच्या तोंडासारखे बनवून ते शिकार्‍याच्या दिशेने करतो. यावेळी तो हुबेहूब सापासारखाच दिसत असतो. यामुळे शिकारी घाबरून निघून जातो. अशा पद्धतीने कॅटरपिलर आपला जीव वाचवतो.

Back to top button