दाताने खेचल्या पाच गाड्या! | पुढारी

दाताने खेचल्या पाच गाड्या!

सिडनी : शक्तीचे काही तरी अचाट प्रकार करून लोकांचे लक्ष वेधून घेणारे आणि विश्वविक्रमही करणारे काही लोक जगाच्या पाठीवर आहेत. केसांनी, दातांनी वाहने खेचणार्‍या काही लोकांचा यामध्ये समावेश होतो. ऑस्ट्रेलियातील बॅकस्टाऊनमधील एका व्यक्तीने एकत्र बांधलेल्या सर्वाधिक गाड्या दातांच्या सहाय्याने खेचून दाखवण्याचा विश्वविक्रम केला आहे. ट्रॉय कॉनले-मॅग्नसन नावाच्या या माणसाने केवळ दातांच्या मदतीने पाच एसयूव्ही खेचून हा पराक्रम केला आहे.

या विश्वविक्रमाचा एक व्हिडीओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की ट्रॉयने केवळ दातांच्या मदतीने पाच गाड्या खेचल्या आहेत. व्हिडीओमध्ये पाच एसयूव्ही आकाराची वाहने एकमेकांना दोरखंडाने बांधलेली आपण पाहू शकतो आणि दोराचे पुढचे टोक ट्रॉयने त्याच्या दातांमध्ये धरले आहे.

त्यानंतर तो आपले शरीर किंचित वाकवून आणि सर्व शक्ती दातांमध्ये एकवटून ही वाहने खेचतो. सर्वात जलद, वीस मीटरपर्यंत हलके विमान दातांच्या मदतीने खेचणे आणि शंभर फुटांपर्यंत वजनदार वाहन ढकलणे यासारखे अन्यही काही विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्याच्या आता शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत.

Back to top button