लघुग्रहांच्या धडकेतूनच पृथ्वीवर जीवसृष्टीचे झाले बीजारोपण | पुढारी

लघुग्रहांच्या धडकेतूनच पृथ्वीवर जीवसृष्टीचे झाले बीजारोपण

टोकियो : लघुग्रहांच्या धडकेने पृथ्वीवर संहार झाला हे तर सर्वांनाच माहिती आहे. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोरसह अनेक प्रजाती नष्ट झाल्या होत्या. मात्र, लघुग्रहांची पृथ्वीला होणारी धडक केवळ संहाराचेच कार्य करीत नसून ती नव्या सृजनाचेही कार्य करते हे आता निष्पन्न झाले आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीची बीजे अशाच लघुग्रहांमुळे पेरली गेली, असे संशोधकांनी म्हटले आहे.

पृथ्वीवर एकपेशीय जीवांची उत्पत्ती 3 अब्ज 90 कोटी वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. हाच तो काळ होता ज्यावेळी पृथ्वी इतकी थंड झाली होती की तिच्या पृष्ठभागावर द्रवरूप पाण्याचे अस्तित्व निर्माण होईल. मात्र, पृथ्वीवर इतक्या लवकर जीवसृष्टी कशी निर्माण झाली हे एक कोडेच होते. त्यासाठी आवश्यक असणारे अमिनो अ‍ॅसिडसारखे मूलभूत घटक कुठून आले याचेही संशोधकांना कुतुहल होते. ही बीजे अंतराळातूनच पृथ्वीवर आली असावीत असे अनेक संशोधकांना वाटत होते.

आता रयुगू लघुग्रहाच्या संशोधनामुळे याबाबतच्या सिद्धांतांची पुष्टीच होत आहे. ‘अमिनो अ‍ॅसिड’ना वास्तवात ‘अमिनोकार्बोक्सील’ असे म्हटले पाहिजे. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणार्‍या मूलभूत रासायनिक घटकांमध्ये त्याचा समावेश होतो. आपले शरीर अमिनो अ‍ॅसिडचा वापर प्रोटिन्स बनवण्यासाठी तसेच ऊर्जा स्रोत म्हणूनही करते. अमिनो अ‍ॅसिडचे जवळजवळ सर्व 20 प्रकार आता रयुगू या लघुग्रहावरील नमुन्यांमध्येही आढळले आहेत. या लघुग्रहावरून आणलेल्या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास जपानसह अन्यही काही देशांमध्ये करण्यात आला. जपानचे अंतराळयान ‘हायाबुसा-2’ ने डिसेंबर 2020 मध्ये ‘रयुगू’वरून हे नमुने आणले होते.

त्यावेळेपासून या नमुन्यांचे वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये अध्ययन होत होते. ‘हायाबुसा-2’ हे यान डिसेंबर 2014 मध्ये सोडण्यात आले होते व चार वर्षांच्या प्रवासानंतर ते आपल्या सौरमंडळातील या लघुग्रहावर पोहोचले होते. तिथे पोहोचणे व नमुने घेऊन परत येणे यासाठी त्याला 5 अब्ज किलोमीटरपेक्षाही अधिक अंतराचा प्रवास करावा लागला. हा एक असा लघुग्रह आहे जो अतिशय कार्बनयुक्त आहे. अशाप्रकारचे लघुग्रह मंगळ आणि गुरुदरम्यानच्या लघुग्रहांच्या पट्ट्यातील बाहेरच्या भागात आढळतात.

या मोहिमेत जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था ‘डीएलआर’ आणि फ्रान्सच्या ‘सीएनईएस’चेही सहयोग मिळालेले आहे. या दोन्ही संस्थांनी मिळून ‘मॅस्कट’ नावाचे एक लँडर बनवले होते जे ‘हायाबुसा-2’ मधून ऑक्टोबर 2018 मध्ये रयुगूच्या पृष्ठभागावर उतरले. या लँडरने रयुगूच्या जाळीदार पृष्ठभागाचा अभ्यास केला व तेथून हे नमुने गोळा केले. याच नमुन्यांमध्ये आता अमिनो अ‍ॅसिडचे वेगवेगळे प्रकार आढळले आहेत. त्यावरून असे स्पष्ट दिसून येते की ‘रयुगू’सारख्या लघुग्रह व उल्कांच्या माध्यमातूनच पृथ्वीवर जीवसृष्टीची ही प्रारंभिक बीजे आली.

Back to top button