पृथ्वीजवळून गेला बस इतक्या आकाराचा लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून गेला बस इतक्या आकाराचा लघुग्रह

वॉशिंग्टन : पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह जात असतात. गुरुवारीही (दि. 7 जुलै) बसइतक्या आकाराचा एक लघुग्रह पृथ्वीजवळून पुढे निघून गेला. त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर केवळ 90 हजार किलोमीटर होते. हे अंतर पृथ्वी आणि चंद्रादरम्यानच्या सरासरी अंतराच्या सुमारे 23 टक्क्यांइतके आहे. विशेष म्हणजे असा एखादा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे हे काही दिवसांपर्यंत संशोधकांनाही माहिती नव्हते!

या लघुग्रहाला ‘2022 एनएफ’ असे नाव देण्यात आले आहे. कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील संशोधकांनी या लघुग्रहाची माहिती दिली. पॅनोरॅमिक सर्व्हे टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टीम (पॅन स्टार्स) च्या डाटाच्या आधारे या लघुग्रहाचा शोध लावण्यात आला.

4 जुलैला या अवकाशीय शिळेची माहिती संशोधकांना समजली व त्यांनी या लघुग्रहाचा अनुमानित आकार मोजला. या लघुग्रहाची रुंदी 18 ते 41 फूट इतकी आहे. हा लघुग्रह आकाराने लहान असल्याने त्याची गणना धोकादायक लघुग्रहांमध्ये झाली नाही. अशा लघुग्रहांमध्ये केवळ किमान 460 फूट लांबीच्या तसेच पृथ्वीपासून 7.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून जाणार्‍या लघुग्रहांचाच समावेश असतो.

Back to top button