मंगळाच्या चंद्रावरून जपान आणणार मातीचे नमुने | पुढारी

मंगळाच्या चंद्रावरून जपान आणणार मातीचे नमुने

टोकियो : जपानच्या ‘जाक्सा’ या अंतराळ संशोधन संस्थेने 2024 मध्ये मंगळाच्या ‘फोबोस’ चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करण्याचे व ते 2029 मध्ये पृथ्वीवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अमेरिका आणि चीनच्या आधी मंगळाशी संबंधित माती पृथ्वीवर आणण्यासाठी जपानी संशोधक प्रयत्नशील आहेत. मंगळ ग्रहाची उत्पत्ती, रचना तसेच तेथील जीवसृष्टीच्या खुणा शोधण्यासाठी तेथील मातीवर संशोधन केले जाईल.

‘जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ किंवा ‘जाक्सा’ने 2024 मध्ये यासाठी एक यान पाठवण्याची योजना आखली आहे. हे यान ‘फोबोस’ या मंगळाच्या चंद्रावरून मातीचे नमुने गोळा करील. अशी दहा ग्रॅम माती (0.35 औंस) गोळा करण्याचे ‘जाक्सा’चे लक्ष्य आहे. 2029 पर्यंत हे नमुने पृथ्वीवर आणले जातील.

या योजनेचे संचालक यासुहिरो कावाकात्सु यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. सध्या ‘नासा’चे ‘पर्सिव्हरन्स’ हे रोव्हर मंगळावरील एका विवरात काम करीत आहे.

ते तेथील खडकमातीचे 31 नमुने गोळा करणार आहे. हे नमुने 2031 मध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या मदतीने पृथ्वीवर आणले जातील. चीनने मे मध्ये मंगळावर एक यान उतरवले असून ते 2030 च्या आसपास तेथील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणार आहे.

कावाकात्सु यांनी सांगितले की, फोबोस या मंगळाच्या चंद्रावरील पृष्ठभागाच्या मातीचा 0.1 टक्का भाग मंगळाचाच आहे. दहा ग्रॅममध्ये सुमारे 30 ग्रॅन्यूल असतात जे मातीच्या स्थिरतेवर अवलंबून आहेत.

Back to top button