दोन निळ्या ग्रहांवर पडतोय हिर्‍यांचा पाऊस | पुढारी

दोन निळ्या ग्रहांवर पडतोय हिर्‍यांचा पाऊस

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत. मात्र, खगोल शास्त्रज्ञांचे सर्वाधिक लक्ष मंगळ, गुरू आणि शनी या ग्रहांवरच असते. आपल्या सूर्यमालेबाहेरही असंख्य अनोखी वैशिष्ट्ये असलेले ग्रह आहेत. मात्र, आपल्याच सूर्यमालेत असे दोन ग्रह आहेत की, त्यांच्यावर चक्‍क हिर्‍यांचा पाऊस पडत असतो. हे ग्रह म्हणजे युरेनस आणि नेपच्यून. दोन निळ्या म्हणजे युरेनस व नेपच्यून ग्रहांवर हिर्‍यांचा पाऊस पडतो, यावर विश्‍वास बसत नसला तरी ते खरे आहे. संशोधक नाओमी रोवे गर्नी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, आपल्या सूर्यमालेतील दोन ग्रहांवर हिर्‍यांचा पाऊस पडतो.

मात्र, तो पृथ्वीवरील पावसासारखा नसतो. हे हिरे ढगांमधून पडत नसतात; पण ते एका वैज्ञानिक प्रक्रियेतून तयार होत असतात. संशोधन गर्नी यांनी पुढे सांगितले की, मिथेन वायूमुळेच युरेनस व नेपच्यून हे ग्रह गडद निळे दिसतात. मिथेन वायूमध्ये कार्बन असतो. या दोन्ही ग्रहांवर वातावरणाचा प्रचंड दाब असतो. यामुळे मिथेन वायूमधून अनेकवेळा कार्बन वेगळा होतो आणि वातावरणाच्या दबावामुळे त्याचे क्रिस्टल बनू लागतात. एकमेकांना चिकटून ते वजनदार बनतात आणि पावसासारखे ते खाली कोसळू लागतात.

आम्ही पृथ्वीवासीय हिर्‍यांना मौल्यवान समजत असलो तरी युरेनस व नेपच्यूनवरील हिरे आणू शकत नाही. कारण पृथ्वीपासून नेपच्यून तब्बल 4.4 अब्ज किमी तर युरेनस 3 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय दोन्ही ग्रहांवर वातावरणाचा मोठा दबाव आहे. यामुळेच इतक्या प्रदीर्घ अंतरावर जाऊन प्रचंड दाब असलेल्या वातावरणातून हिरे आणणे मानवाला अशक्य बनते.

Back to top button