अचानक घाम येणे गंभीर आजाराचे संकेत | पुढारी

अचानक घाम येणे गंभीर आजाराचे संकेत

नवी दिल्ली : उन्हाळ्यात, व्यायाम अथवा काम करताना घाम येणे ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र, एखाद्याला अचानक जास्त घाम आला आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते प्रसंगी धोकादायक ठरू शकते. विशेषज्ञांच्या मते, अचानक जास्त घाम येणे हे हृदयासंबंधी गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. याकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर कधी कधी जीवावरही बेतू शकते. मात्र, वेळीच उपचार घेतले तर धोका टळू शकतो.

‘द मिरर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या इशार्‍यानुसार अचानक सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात घाम येणे हे हार्ट अ‍ॅटॅकचे संकेत असू शकतात. मात्र, तो घाम व्यायाम करताना, जास्त तापमान असताना आलेला नसावा. दरम्यान, हृदयविकाराचा झटका ही अशी स्थिती असते की, ज्यामध्ये हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होणारे फॅट कोलेस्टेरॉल हे यामागचे मुख्य कारण असू शकते. तज्ज्ञांच्या मते, अचानक घाम आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतल्यास जीवावरील संकट टाळण्यास मदत होते. अत्याधिक घाम येऊन हार्ट अ‍ॅटॅक येतो, त्या स्थितीला सेकंडरी हायपरहाईड्रोसिस असेही म्हटले जाते.

Back to top button