महापौरांनी केला मगरीशी विवाह | पुढारी

महापौरांनी केला मगरीशी विवाह

मेक्सिको : विवाह प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण सोहळा समजला जातो. मात्र, सध्या कोण कोणाशी विवाह करेल, याचा काही थांगपत्ता लागत नाही. मेक्सिकोत झालेल्या अशाच एका विवाहाची जगभरात चर्चा सुरू आहे. मेक्सिकोच्या ओक्साका राज्यातील एका छोट्या गावच्या महापौरांनी चक्‍क मगरीशी विवाह केला. या अनोख्या विवाहाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

सॅन पेड्रो हुआमेलुला गावचे महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी सात वर्षांच्या मगरीसोबत विवाह केला. विवाहावेळी मगरीला वधूचा पांढरा ड्रेस व अन्य रंगीबेरंगी कपडे घालून सजविण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे नववधूचे तोंड घट्ट बांधण्यात आले होते.

मेक्सिकोतील ओक्साका राज्यातील चोंतल आणि हुआवे समुदायात मगरीशी विवाह करणे, ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्याचे सांगितले जाते. या देशात मगरीला एक लहान राजकुमारी मानले जाते. जी धरणीमातेचे प्रतिनिधित्व करते. तसेच महापौरांचा मगरीशी विवाह म्हणजे ईश्‍वराशी जोडले जाण्याचे प्रतीक समजले जाते. याद्वारे ईश्‍वराचे आभार व्यक्‍त केले जाते. आपल्या कथित विवाहाबद्दल मेयर व्हिक्टर यांनी सांगितले की, या विवाहाच्या माध्यमातून आम्ही पुरेसा पाऊस पडावा, अशी देवाकडे मागणी करतो; जेणेकरून नद्यांमध्ये पुरेसे मासे आढळतील आणि सर्वांना पुरेसे जेवण मिळेल.

Back to top button