पृथ्वीच्या दिशेने येतोय विशालकाय धूमकेतू | पुढारी

पृथ्वीच्या दिशेने येतोय विशालकाय धूमकेतू

पासाडोना : सध्या सुरू झालेल्या जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने विशालकाय धूमकेतू येत आहे. या धूमकेतूला प्रथमच 2017 मध्ये पाहण्यात आले होते. असा हा धूमकेतू 14 जुलै 2022 रोजी पृथ्वीजवळून प्रचंड वेगाने निघून जाणार आहे. 2017 मध्ये पहिल्यांदा दिसलेल्या या धूमकेतूचे नाव ‘कॉमेट सी/2017 के 2’ असे आहे. सामान्य भाषेत या धूमकेतूला ‘के 2’ या नावाने ओळखले जाते. ‘हबल’ स्पेस टेलिस्कोपने ‘के 2’चा शोध लावला आहे. ज्यावेळी शोध लागला त्यावेळी हा धूमकेतून आपल्या सूर्यमालेच्या बाह्यवर्ती भागात होता. त्यावेळी त्याला आतापर्यंतचा सर्वाधिक दूरवरचा धूमकेतू असल्याचे म्हटले गेले होते. आता हाच धूमकेतू अवघ्या 11 दिवसांनी पृथ्वीजवळून जाणार आहे.

14 जुलै रोजी ‘के 2’ पृथ्वीजवळून जाणार असे म्हटले जात असले तरी त्यावेळी या दोहोंमधील अंतर तब्बल 27 कोटी कि.मी. इतके प्रचंड असेल. यामुळे या धूमकेतूपासून पृथ्वीला कोणताच धोका नाही. मात्र, खगोलशास्त्रज्ञांसाठी ही संधी संशोधनाच्या दृष्टीने पर्वणीच ठरणार आहे. सर्वसामान्यपणे धूमकेतू हे वायू, दगड व धुळीचा एक गुच्छ असतात. ज्यावेळी ते सूर्याजवळ जातात, त्यावेळी ते प्रचंड तापमानामुळे विरघळू लागतात. अशावेळी धूमकेतूच्या पाठीमागे पांढरी शेपटी दिसते. ज्यावेळी धूमकेतूच्या चारही बाजूंनी ढग बनतो, त्यावेळी त्याला ‘कोमा’ असे म्हटले जाते. ‘के 2’ या धूमकेतूचा आकार 30 ते 160 कि.मी. लांब असू शकतो. मात्र, हबलने ‘के 2’ची लांबी सुमारे 18 कि.मी. असल्याची माहिती दिली होती.

Back to top button