गेल्या 20 वर्षांत 36 देशांत वाढले वनक्षेत्र | पुढारी

गेल्या 20 वर्षांत 36 देशांत वाढले वनक्षेत्र

मेरिलँड (अमेरिका) : जंगल क्षेत्र घटणे हे कारणही जागतिक तापमानवाढीस जबाबदार ठरत आहे. जंगलतोड ही एक मोठी समस्या बनली आहे. जगात एकूण झाडांची संख्या किती आहे? यासंदर्भात ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड व डब्ल्यूआरआय’ने संशोधन केले आहे. संशोधनातील माहितीनुसार, सन 2000 ते 2020 या कालावधीत जगात 13.09 कोटी हेक्टर जंगलक्षेत्र वाढले. हे क्षेत्र पेरू या देशाइतके असू शकते. मात्र, जंगल एका बाजूने वाढत असले तरी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही सुरूच आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने जुन्या जंगलासारखा नव्या जंगलाचा लाभ होत नाही.

संशोधनातील माहितीनुसार, जगातील एकूण 36 देशांमधील वनक्षेत्रात वाढ झाली आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त जंगल रशिया, कॅनडा आणि अमेरिकेत वाढले आहे. या तीन देशांत 6.8 कोटी हेक्टर वनक्षेत्र वाढले आहे. मात्र, याच देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही झाली आहे.वरील देशांसह आयर्लंड, पोलंड, डेन्मार्क व नेदरलँड या युरोपीय देशांमध्येही जंगलक्षेत्र वाढले आहे. सन 2000 च्या तुलनेत या देशांमध्ये 60 लाख हेक्टरची नव्याने भर पडली आहे. याशिवाय भारत, तजाकिस्तान, किर्गिस्थान, बांगलादेश आणि पाकिस्तान या आशियाई देशांमध्येही जंगलक्षेत्रात भर पडली आहे. तसेच आफ्रिकेतील सुदान, मोरोक्‍को व अल्जेरिया तसेच अमेरिकेतील उरुग्वेमध्येही जंगलक्षेत्रात वाढ झाली आहे. भविष्यात आणखी वनक्षेत्रात वाढ झाली तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Back to top button