हायड्रोजनच्या कमतरतेमुळे थांबते तार्‍यांची निर्मिती | पुढारी

हायड्रोजनच्या कमतरतेमुळे थांबते तार्‍यांची निर्मिती

पुणे : शंभर अब्ज आकाशगंगांचा समूह म्हणजेच दीर्घिकेतील आण्विक हायड्रोजन कमी होताच तार्‍यांच्या निर्मितीचा वेग मंदावतो, यावर प्रत्यक्ष पुराव्यांनी शिक्‍कामोर्तब झाले आहे. सुमारे नऊ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकेतील आण्विक हायड्रोजन एक अब्ज वर्षांनी तिपटीने घटल्याचे भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनातून पुढे आले आहे. पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी नारायणगाव जवळील अद्ययावत जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपच्या (यूजीएमआरटी) साहाय्याने ही निरीक्षणे मिळविली आहेत. संशोधक विद्यार्थी आदित्य चौधरी, प्रा. निस्सीम काणेकर आणि प्रा. जयराम चेंगलूरू यांच्या संशोधक गटाने हे संशोधन केले आहे. एक अब्ज वर्षांत प्रचंड वेगाने आण्विक हायड्रोजन कमी झाल्याचे निरीक्षण यूजीएमआरटीने नोंदविले आहे. यासंबंधीचे संशोधन नुकतेच अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

दीर्घिकेतील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आण्विक हायड्रोजन आणि तारे. तार्‍यांच्या निर्मितीसाठी आण्विक हायड्रोजन रूपी इंधनाची आवश्यकता असते. एकदा का हायड्रोजन संपला की तार्‍याची निर्मिती थांबते. जवळपास दोन दशकांपासून हे शास्त्रज्ञांना माहीत होते. सुमारे आठ ते 11 अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांमध्ये तारा निर्मितीचा वेग आजपेक्षा दहा पटीने जास्त होता. आण्विक हायड्रोजन आणि तार्‍यांच्या निर्मितीचा दर सुरुवातीच्या काळातील दीर्घिकांचे वर्तन समजून घेण्यास उपयोगी पडणार आहे.

…असे झाले संशोधन

अद्ययावत जीएमआरटीच्या साहाय्याने आठ आणि नऊ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांतील हायड्रोजनची निरीक्षणे घेतली. यासाठी जीएमआरटी-सीएटीझेड 1 या सर्व्हेचा वापर केला.

Back to top button