प्राचीन शार्कचा सात इंचांचा दात! | पुढारी

प्राचीन शार्कचा सात इंचांचा दात!

वॉशिंग्टन : जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शार्क मासा होता मेगालोडन. हा मासा 16 मीटर लांबीच्या स्पर्म व्हेलला केवळ नाश्ता समजूनच खात होता, इतका तो मोठ्या आकाराचा होता! हा शार्क 30 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवरील तापमानात घट झाल्याने लुप्‍त झाला. अशा माशाचा एक दातच सात इंच लांबीचा होता.

सध्याचा सर्वात मोठा आणि खतरनाक समजल्या जाणार्‍या ग्रेट व्हाईट शार्कपेक्षा हा मासा साडेतीन पटीने अधिक मोठा होता. त्यांची लांबी 65 फुटांपर्यंत होती व वजन 50 टनांपर्यंत होते. या माशांचे सात इंच लांबीचे दात 16 मीटर लांबीच्या स्पर्म व्हेलला फाडून काढण्यास समर्थ होते. स्पर्म व्हेलचे नाक त्याच्या शरीराच्या एक तृतियांशाइतके असते. त्याच्या शरीरात तेल आणि चरबी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेगालोडन अशा स्पर्म व्हेलला शिकार बनवत असत व त्यापासून त्यांना पौष्टिक घटक मिळत असत.

हा प्राचीन शिकारी एक अन्य प्रागैतिहासिक सागरी दैत्य लेविथान मेलविलेवरही हल्‍ला करीत असे. हे संपूर्ण संशोधन दक्षिण पेरूच्या किनारपट्टीवरील इका वाळवंटातून मिळालेल्या 70 लाख वर्षांपूर्वीच्या स्पर्म व्हेलच्या कवटीच्या जीवाश्मावर आधारित आहे. या कवटीवर मेगालोडन शार्कच्या दातांच्या खुणा स्पष्टपणे उमटलेल्या आहेत.

Back to top button