ब्रोकोलीचा ज्यूसही ठरतो लाभदायक | पुढारी

ब्रोकोलीचा ज्यूसही ठरतो लाभदायक

नवी दिल्‍ली : कॉलिफ्लॉवरसारखीच दिसणारी; पण हिरव्या रंगाची भाजी म्हणजे ब्रोकोली. या ब्रोकोलीचा अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापर केला जात असतो. मात्र, तिच्या रसाचाही आरोग्यासाठी मोठा उपयोग होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः मेंदूच्या आरोग्यासाठी हा रस अधिक उपयुक्‍त ठरतो.

ब्रोकोलीमध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंटस्, कॅल्शियम, लोह आणि ‘अ’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय फायबर आणि ‘क’ जीवनसत्त्वही मुबलक प्रमाणात आढळते. ब्रोकोलीच्या रसात विरघळणारे फायबर असते, जे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च रक्‍तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठी ब्रोकोलीचा रस फायदेशीर ठरू शकतो.

या रसामधील अँटिऑक्सिडंटस् आणि फायबर मधुमेह नियंत्रित करण्यासाठी लाभदायक आहेत. ब्रोकोलीचा रस हाडांसाठीही लाभदायक आहे. त्यामध्ये कॅल्शियम व ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी मदत मिळते. शरीरातील लाल पेशी वाढवण्यासाठीही हा रस उपयुक्‍त आहे.

Back to top button